जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

Photo of author

By Sandhya

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

एल-निनोचा प्रभावामुळे पाणी पुरवठाबाबत नियोजन करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे, दि. २४: एल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे, ही बाब लक्षात घेता जलसंपदा विभागाने पाणी पुरवठ्याबाबत नियोजन करावे. मान्सूनपुर्व करावयाचे कामांचे सुक्ष्म नियोजन करुन ती सर्व कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावीत, कामे करतांना सर्व सबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा.असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी दिले.

याबैठकीत जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकरी विठ्ठल बनोटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी, आरोग्य, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका, नगर परिषद, पुणे प पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जलसंपदा, एनडीआरएफ भारतीय हवामान विभागासह सर्व संबंधित विभागांचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, यावर्षी १५ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल यादृष्टीने जलसंपदा विभागाने नियाजन केले आहे.परंतु एल-निनोचा प्रभाव लक्षात घेता सन २०२७ मध्ये फेब्रुवारी ते मे या कालावधीत पाणी पुरेल यादृष्टीने कार्यवाही करावी, गतवर्षी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत जलसंपदा विभागाने उत्तम नियोजन केले होते, त्याचदृष्टीने यावर्षीही समन्वयाने कार्यवाही करावी. नदी, कालवा, नाला परिसरात अतिक्रमणे, राडारोडा काढण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुरळीत राहतील , यादृष्टीने कार्यवाही करावी. धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आढावा, धरण बांधकाम, कालव्याची तपासणी करावी. गतवर्षी केलेल्या तपासणीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा कार्यपालन अहवाल माहे एप्रिल अखेरचा जिल्हाधिकारी कार्यालयास कळवावा.

सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पुल, रस्ते, पूरबाधित गावांची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. गतवर्षी केलेल्या तपासणीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा कार्यपालन अहवाल माहे एप्रिलअखेर सादर करावा. पावसाळ्यात बंद रस्त्याला असलेले पर्यायी रस्त्याबाबत माहिती नागरिकांना द्यावी. आणीबाणीच्या वेळी उपयोगात येणारी बुलडोझर्स, वॉटरटँकर्स, डंपर्स, अर्थमुव्हर्स, डिवॉटरींग पंप्स, जनरेटर्स, ट्री कटर्स, फल्ड लाईट, आर.सी.सी.कटर्स, इत्यादी साहित्याची चालू स्थितीमध्ये असल्याबाबत याची खात्री करुन घ्यावी.


पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नगरपरिषद नगरपंचायतीने आपल्या हद्दीतील धोकादायक इमारतीची बांधकाम तपासणी करावी. धोकादायक इमारतीमधील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थालंतर करावे. जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी आपल्या हद्दीतील अनाधिकृत जाहिरात फलके महिन्याभरात काढून घ्यावीत.

पावसाळ्यात पर्यटनस्थळे बंद केली जाणार नाहीत, त्यामुळे पर्यटनस्थळी एकाच वेळी किती पर्यटकांना सोडता येईल, सुरक्षितेतच्यादृष्टीने पोलीस, वन, पर्यटन, पुरात्व विभागाने पर्यटकांचे स्लॉट तयार करावेत. पर्यटनस्थळी आवश्यक ते प्रमाणे मनुष्यबळ नियुक्त करावे.

आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालिन परिस्थितीचा विचार करुन नागरिकांना तात्काळ सेवा मिळेल, याबाबत नियोजन करावे. तालुकानिहाय रुग्णालय, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे साठा तयार ठेवावे. साथीचे रोग व उपचारपद्धती आदीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, याबाबत नागरिकांना माहिती द्यावी.

संबंधित विभागाने जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यत आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करुन घ्यावा. याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. आजच्या बैठकीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेवून संबंधिताना सूचना द्याव्यात. मान्सून काळात पूरबाधित गावाच्या अनुषंगाने आपत्कालीन यंत्रणा सर्व विभागांच्या समन्वयाने सज्ज ठेवावी. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता आपत्तीच्या काळात आवश्यक त्या सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात यावे. भोर, खेड, आंबेगाव उपविभागात भुस्खलनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांचे स्थलांतर, आपदा मित्राचे प्रशिक्षण, सुसज्ज साहित्य तसेच मॉकड्रीलचे आयोजनाबाबत कार्यवाही करावी. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने त्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील यादृष्टीने नियोजन करावे.

यावेळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने करीत असलेल्या तयारीबाबत माहिती दिली.

Leave a Comment

You cannot copy content of this page