Headlines

येवलेवाडी येथे भटक्या-विमुक्त समाजांच्या पुनर्वसनाला सकारात्मक दिशा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे ठोस आश्वासन

विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थीने बैठक; जागेसह घरकुलासाठी शासकीय निधी, जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतः ₹१ लाख मदतीची घोषणा

पुणे, दि. १२ सप्टेंबर २०२६ : पुणे जिल्ह्यातील भटक्या व विमुक्त जाती-जमातींमधील मरीआई, नाथपंथी डवरी गोसावी, भराडी, वासुदेव, गोंधळी आणि नंदीवाले या समाजघटकांतील निवाऱ्याविना व अत्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या पुनर्वसनाला आता सकारात्मक दिशा मिळाली आहे.

येवलेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या मरीआई समाजातील सुमारे ५० गोरगरीब कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा. श्री. विजय वडेट्टीवार साहेब यांच्या मध्यस्थीने पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी साहेब यांच्यासमवेत शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

या बैठकीत संबंधित कुटुंबांची सामाजिक, आर्थिक व निवासाची परिस्थिती सविस्तरपणे मांडण्यात आली. यावेळी येवलेवाडी येथील सदर जागेवरच कायदेशीर प्रक्रियेच्या अधीन राहून पुनर्वसन करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ठोस आश्वासन दिले.

विशेष म्हणजे, केवळ जागा उपलब्ध करून न थांबता घर उभारण्यासाठी आवश्यक निधी विविध शासकीय फंडातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. तसेच “या गोरगरीब कुटुंबांसाठी मी स्वतः ₹१ लाखांची मदत करणार,” अशी संवेदनशील घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या भूमिकेचे उपस्थित शिष्टमंडळाने टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

पुनर्वसनासाठी महसूल विभाग, वन विभाग व संबंधित शासकीय यंत्रणांमध्ये तत्काळ चर्चा सुरू झाली असून, प्रत्येक पात्र कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रशासन सकारात्मक पावले उचलत आहे.

या बैठकीत ओबीसी समाजाचे नेते व भटक्या-विमुक्त समाजाचे मार्गदर्शक ॲड. मंगेश ससाणे साहेब यांनी समाजाची कायदेशीर, सामाजिक व मानवी बाजू प्रभावीपणे मांडली. तर भैरव क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष विजय सुदामराव जाधव यांनी सर्व लाभार्थी कुटुंबांची सविस्तर माहिती प्रशासनासमोर मांडून महसूल विभागाच्या आतापर्यंतच्या सकारात्मक कार्यवाहीचे कौतुक केले.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी कॅबिनेट मंत्री मा. नामदार अतुल सावे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच भैरव क्रांती सेना आणि जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून या भटक्या-विमुक्त कुटुंबांच्या हक्काच्या घरासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यानंतर हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा

देश स्वतंत्र होऊन अनेक दशके उलटल्यानंतरही निवाऱ्याविना जीवन जगणाऱ्या या भटक्या-विमुक्त समाजातील गोरगरीब कुटुंबांना आता स्वतःच्या हक्काच्या घरात सन्मानाने राहण्याची आशा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे येवलेवाडी परिसरात आनंदाचे वातावरण असून, हक्काचे घर मिळण्याच्या आशेने संबंधित कुटुंबांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संविधानातील सामाजिक न्याय, समानता आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणारी ही सकारात्मक सुरुवात असून, प्रत्येक पात्र भटक्या-विमुक्त कुटुंबाला हक्काचे व सुरक्षित घर मिळेपर्यंत भैरव क्रांती सेना व जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष विजय जाधव यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *