


पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार;
प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार
ज्येष्ठ लेखक, अभिनेते व निर्माते सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार;
राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार
मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रपटगृहे उभारण्याचा राज्य सरकारचा मानस — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई(शेखर म्हात्रे ):- दि. 10 -9-2026, मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात विविध श्रेणीतील महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसह चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
भारतीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ पटकथालेखक, अभिनेते व निर्माते सलीम खान यांच्यावतीने त्यांच्या पत्नी हेलन यांनी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला, तर अभिनेत्री डॉ. राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांतील उल्लेखनीय कलात्मक कामगिरी आणि योगदानाची दखल घेत विविध श्रेणींमध्ये ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ आणि ‘फुलवंती’ या चित्रपटांतील अभिनयासाठी सुनील बर्वे आणि गश्मीर महाजनी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विभागून देण्यात आला. ‘छबिला’ या चित्रपटासाठी स्वाती गोतावळे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. ‘छबिला’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. ‘घरत गणपती’ हा प्रथम उपविजेता, तर ‘नाच गं घुमा’ हा द्वितीय उपविजेता ठरला.
या सोहळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, पुरस्कारप्राप्त कलाकार तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘खंजिरीचे बोल’ या चरित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या चरित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाचा गौरव केला. प्रत्येक पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीचा विशेष उल्लेख करत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी राज्य सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रपटगृहे उभारण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबतचा प्रस्ताव सध्या तयार करण्यात येत असून लवकरच त्याची घोषणा करण्यात येईल. आशय आणि दर्जाच्या बाबतीत मराठी चित्रपटसृष्टीने सातत्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून प्रेक्षकांकडूनही मराठी चित्रपटांना कायमच मोठा प्रतिसाद मिळतो.”
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारातील सर्व पुरस्कारप्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या चित्रपटांना व्यापक प्रेक्षकवर्ग मिळवून देण्यासाठी तसेच राज्यातील चित्रपट निर्मितीचे परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. एन. डी. स्टुडिओ, फिल्मसिटी, कोल्हापूर येथे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी उपलब्ध सुविधा तसेच रामटेक येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या सुविधांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीसाठी उपलब्ध संधी आणि पायाभूत सुविधा सातत्याने वाढविण्यात येत आहेत.”
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या चित्रपट आणि सांस्कृतिक प्रवासाला समृद्ध करणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपट निर्मात्यांच्या योगदानाची दखल घेण्याची संधी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमधून मिळते. त्यांच्या कार्याचा गौरव करून नवोदित कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांना मराठी चित्रपटसृष्टीची समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी प्रेरणा देणे, हा या पुरस्कारांचा प्रमुख उद्देश आहे. ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा हा चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या योगदानाचा गौरव करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.”
• उत्कृष्ट कला दिग्दर्शन – संतोष फुटाणे, महेश कोरे,
• उत्कृष्ट छायालेखन महेश आणे, महेश लिमये,
• उत्कृष्ट संकलन -अभिजित देशपांडे, विजय कलमकर,
• उत्कृष्ट ध्वनीमुद्रण सतीश दडस
• उत्कृष्ट ध्वनी संयोजन – संजय चतुर्वेदी,
• उत्कृष्ट वेशभूषा- गणेश लोणारे, शिवाजी करडे,
• उत्कृष्ट रंगभूषा – संजय सिंग, संतोष गिलबिले
• उत्कृष्ट बालकलाकार म्हणून सावित्रीच्या लेकी चित्रपटातील धनश्री भोसले, दृष्टी मोरे, रसिका खंडागळे, एंजल कालीकुरी
• सर्वोत्कृष्ट कथा – जयंत सोमलकर (स्थळ)
• उत्कृष्ट पटकथा – अमरजीत आमले (कुर्ला टू वेंगुर्ला)
• उत्कृष्ट संवाद – राम खाटमोडे, विनोद वणवे ( नवरदेव BSC Agri)
• उत्कृष्ट गीत – रॉकसन (नवरदेव BSC Agri)
• उत्कृष्ट संगीत- अक्षय खोत (कुर्ला टु वेंगुर्ला)
• उत्कृष्ट पार्श्वसंगीत- संतोष मुळेकर(संगीत मानपमान)
• उत्कृष्ट पार्श्वगायक- आदर्श शिंदे (लग्नकल्लोळ)
• उत्कृष्ट पार्श्वगायिका- राजेश्वरी पवार(सजना)
• उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – उमेश जाधव (फुलवंती)
• उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – रितिका श्रोत्री (मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी)
• उत्कृष्ट विनोदी अभिनेता – अमेय परब (कुर्ला टू वेंगुर्ला)
• सहायक अभिनेता- तारानाथ खिरतकर(स्थळ), जनार्दन कदम (घात) विभागून
• सहायक अभिनेत्री – नम्रता संभेराव (नाच गं घुमा)
• प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन – अनिल भालेराव (छबिला)
• प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती – निर्मिती संस्था अ स्केअर ग्रुप (भुंडीस)
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अनिल भालेराव (छबीला)
• दिग्दर्शक द्वितीय क्रमांक – नवजोत बांदिवडेकर (घरत गणपती)
• दिग्दर्शक तृतीय क्रमांक – परेश मोकाशी (नाच ग घुमा)
………………………………………………………………………………
• उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता, आदीश वैद्य
• उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री – भक्ती घोगरे
•
………………………………………………………………………………………
• उत्कृष्ट दिग्दर्शक – जयंत सोमलकर (स्थळ)
• चित्रपती व्ही शांताराम सामाजिक चित्रपट निर्मिती संस्था – चित्रपट स्थळ
• कै. अनंत माने ग्रामिण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – रामचंद्र खाटमोडे (नवरदेव BSC AGRI)
• कै. दादा कोंडके ग्रामिण प्रश्न हाताळणारी निर्मिती संस्था – नवरदेव BSC AGRI
……………………………………………..
