Headlines

दिवाळीत खासगी बसकडून जादा भाडे आकारल्यास कारवाई; इंदापूरमधील प्रवाशांनीही तक्रार नोंदवावी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा; तिकिटाच्या छायाचित्रासह व्हॉट्सॲपवर तक्रार करण्याचे आवाहन

इंदापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी बसमालकांनी शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारू नये. जादा भाडे आकारणी करणाऱ्या बसमालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा, १९८८ व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्यासह इंदापूर परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही खासगी बसचे भाडे भरताना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या तसेच कामानिमित्त बाहेरगावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. या काळात खासगी बसकडून अधिक भाडे आकारले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे बसमालक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. प्रवाशांची आर्थिक पिळवणूक रोखणे आणि रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

शासनाच्या २० एप्रिल २०१८ रोजीच्या निर्णयानुसार खासगी बसमालकांना निर्धारित भाड्याच्या मर्यादेतच प्रवासी भाडे आकारणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसमालकांवर दिवाळीच्या कालावधीत विशेष लक्ष ठेवून कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, इंदापूर तालुक्यातून पुणे, मुंबई तसेच अन्य शहरांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकिटावरील भाड्याची नोंद ठेवावी. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारल्याचे आढळल्यास तिकिटाचा पुरावा जतन करून संबंधित कार्यालयाकडे तक्रार करावी. तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक ८२७५३३०२०९ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तक्रार नोंदविताना प्रवाशांनी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक आणि तिकिटाचे छायाचित्र पाठवावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

याशिवाय बसचालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन चालवताना भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि वाहनाची आवश्यक कागदपत्रे वैध स्थितीत ठेवावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.जादा भाडे देण्याची सक्ती झाल्यास प्रवाशांनी गप्प न राहता पुराव्यासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.