महावितरणच्या आळंदी विभागातील कारभाराविरोधात वीजग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वीजबिलांमधील त्रुटी, वाढीव बिले आणि तक्रारींच्या निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या वारंवार फेऱ्या यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड.सौरभ गव्हाणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत कारभारात सुधारणा करण्याची मागणी केली.
वीजबिल दुरुस्तीसाठी सोमवार आणि गुरुवार असे आठवड्यातील केवळ दोन दिवसच अधिकारी उपलब्ध असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. अंदाजे मीटर रीडिंगच्या आधारे वाढीव बिले आकारली जात असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी मांडल्या. तसेच मीटर रीडिंग घेताना छायाचित्रे न काढणे, वीजबिलांचे योग्य प्रकारे वितरण न होणे आणि स्मार्ट मीटरमुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
सर्वसामान्य नागरिकांना वीजबिल दुरुस्तीसारख्या साध्या कामासाठी वारंवार कार्यालयात यावे लागत असेल, तर महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत असताना त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण का होत नाही, असा सवाल ॲड.सौरभ गव्हाणे यांनी उपस्थित केला. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करावी आणि वीजबिलांमधील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी नगरसेवक सागर कुऱ्हाडे यांच्यासह अनेक वीजग्राहक उपस्थित होते.
