


महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक उपक्रम; ध्वज उभारणीसाठी जागेची पाहणी व निश्चिती पूर्ण
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले सिंहगडावर आता १०० फुटी भव्य भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. पुणे प्रथम आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून हा ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येणार असून, या ध्वजामुळे सिंहगडाच्या ऐतिहासिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा जोडला जाणार आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने आज किल्ले सिंहगड परिसरातील एमटीडीसीजवळील सुमारे एक एकर जागेची प्रत्यक्ष पाहणी करून ध्वज उभारणीसाठी जागा निश्चित करण्यात आली. किल्ल्याच्या विविध भागांतून तसेच सिंहगड परिसरापासून दूरवरूनही हा भव्य भगवा ध्वज स्पष्टपणे आणि दिमाखात दिसावा, याचा विचार करून मोक्याच्या ठिकाणी ध्वज उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी या पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून जागा, ध्वजस्तंभाची उंची, सुरक्षितता, संरचनात्मक बाबी तसेच परिसराच्या दृष्टीने आवश्यक नियोजनाची माहिती घेतली. ध्वज उभारणीनंतर रात्रीच्या वेळीही त्याचे भव्य स्वरूप उठून दिसावे, यासाठी अत्याधुनिक विद्युत रोषणाईची विशेष व्यवस्था करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येणार आहे.
सिंहगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि मावळ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास सांगणारा ऐतिहासिक किल्ला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक भूमीवर उभारण्यात येणारा १०० फुटी भगवा ध्वज हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची, स्वराज्याच्या विचारांची आणि शौर्यपरंपरेची प्रेरणा देणारे प्रतीक ठरेल, अशी भावना महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केली.
या उपक्रमासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक आणि संरचनात्मक बाबींची पूर्तता करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
यावेळी पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर तसेच एमटीडीसीचे चीफ रिजनल मॅनेजर हनुमंत खेडे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
