Headlines

पुण्यातील स्टार्टअपचा कान्समध्ये (फ्रान्स) गौरव

वृद्धांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादने डिझाइन करणाऱ्या पुण्यातील ‘हाऊस ऑफ टुमारो’ या स्टार्टअपला ‘इनलू’ या उत्पादनाच्या डिझाइनसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. ‘इनलू’ ही कोणत्याही व्यक्तीला आरामात वापरता येईल अशा प्रकारे तयार करण्यात आलेली टॉयलेट अटॅचमेंट आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना टॉयलेटमध्ये बसणे आणि उठणे सोपे होते तसेच त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींनाही मदत होते. वृद्धांच्या गरजेनुसार बाथरूममध्ये मोठे आणि खर्चिक बदल करण्याची गरजही ‘इनलू’मुळे टाळता येते.

आर्किटेक्ट ऐश्वर्या एडाखे आणि प्रॉडक्ट डिझायनर शगुन मालवीय यांनी ‘हाऊस ऑफ टुमारो’ची स्थापना केली आहे. चांगल्या प्रकारे वृद्धत्वाकडे जाणे हा केवळ वैद्यकीय विषय नसून डिझाइनशीही संबंधित विषय आहे, अशी ‘हाऊस ऑफ टुमारो’ची भूमिका आहे. कंपनीचे प्रमुख उत्पादन ‘इनलू’ हे ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा स्वावलंबी होण्यास मदत करण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आले आहे. कमोडला जोडता येणारे सहाय्यक उपकरण किंवा बाथरूममध्ये वापरता येणारी पोर्टेबल टॉयलेट चेअर अशा दोन्ही प्रकारे त्याचा वापर करता येतो.

ऐश्वर्या एडाखे म्हणाल्या, “वृद्धांचे जीवन अधिक सुलभ करणारे नाविन्यपूर्ण उत्पादन म्हणून ‘इनलू’ला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे उत्पादक, व्यावसायिक क्षेत्र आणि कुटुंबांसह जगभरातील सर्व संबंधित घटकांकडून या उत्पादनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.”

कान्समधील पॅले दे फेस्टिव्हल्स येथे आयोजित सिल्व्हरइको अँड एजिंग वेल इंटरनॅशनल अवॉर्ड्स 2026मध्ये पुण्यातील या स्टार्टअपला ऑटोनॉमी अँड इंडिपेंडंट लिव्हिंग श्रेणीतील ‘बेस्ट इनिशिएटिव्ह’ पुरस्कार मिळाला आहे.

यंदा 18व्या वर्षात पदार्पण केलेल्या सिल्व्हरइको अँड एजिंग वेल इंटरनॅशनल अवॉर्ड्सचे आयोजन युरोपमधील सिल्व्हर इकॉनॉमी क्षेत्रातील आघाडीचे व्यासपीठ असलेल्या SilverEco.orgकडून करण्यात येते. यापूर्वी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पॅरिस आणि टोकियो येथे करण्यात आले होते, तर 2021पासून हा सोहळा कान्स येथे आयोजित करण्यात येत आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील 19हून अधिक देशांमधून या पुरस्कारासाठी प्रवेशिका येतात.

या पुरस्कारापूर्वी ‘हाऊस ऑफ टुमारो’ला मानवकेंद्री डिझाइनमधील योगदानासाठी डॉन नॉर्मन डिझाइन अवॉर्ड (DNDA) – इंडियानेही गौरवण्यात आले होते. त्यामुळे लागोपाठ दोन पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या स्टार्टअप्समध्ये ‘हाऊस ऑफ टुमारो’चा समावेश झाला आहे.

हाऊस ऑफ टुमारोविषयी

‘हाऊस ऑफ टुमारो’ हा ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पादने विकसित करणारा पुण्यातील डिझाइन स्टुडिओ आहे. कंपनीचे प्रमुख उत्पादन ‘इनलू’ हे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अधिक स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेले टॉयलेट अटॅचमेंट आहे. आर्किटेक्ट ऐश्वर्या एडाखे आणि प्रॉडक्ट डिझायनर शगुन मालवीय या पहिल्या पिढीतील उद्योजकांनी या कंपनीची सह-स्थापना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *