Headlines

“आदरणीय अजितदादांप्रमाणेच मी आपल्या सर्वांच्या सोबत उभी आहे” – सुनेत्रा पवार

अजितदादांच्या वारशाची जबाबदारी आता आपल्या सर्वांची; सुनेत्रा पवार भावुक

“अजितदादांचा वारसा पुढे नेत बारामती सहकारी बँकेला आधुनिक स्वरूप देऊया” – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बारामती : दि बारामती सहकारी बँक लि.च्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, भिगवण रोड, बारामती येथे पार पडली.

यावेळी सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, “अनेक वर्षांपासून सगळे म्हणायचे, वहिनी तुम्ही अजितदादांसोबत वार्षिक सर्वसाधारण सभेत हजर राहायला हवे. मात्र, अशा सभांना मला एकट्याने यावे लागेल, असे मला कधीच वाटले नव्हते. अजितदादांची सर कधीच कोणाला येणार नाही,” असे म्हणताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

“काळ कोणासाठीही थांबत नाही. आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, अजितदादांनी घालून दिलेला वारसा आणि विचार पुढे न्यावा. गेल्या पाच वर्षांत अजितदादांच्या नेतृत्वाखाली बँकेने अत्यंत दमदार कामगिरी केली आहे. बँकेने ३८.८५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे,” असे त्यांनी नमूद केले.

बारामती सहकारी बँकेचा राज्यभर विस्तार करताना तिला आधुनिक स्वरूप देण्याची गरज असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, “सभासदांचा विश्वास जपत बँकेने उद्योगधंदे, शेतकरी आणि तरुणांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. भविष्यातही हीच भूमिका अधिक सक्षमपणे पुढे न्यावी. सहकारी संस्थांच्या यशामध्ये सभासद आणि संचालकांचा महत्त्वाचा वाटा असतो,” असे त्यांनी सांगितले.

बँकेच्या वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच, “स्वर्गीय अजितदादांनी लावलेली आर्थिक शिस्त आपण सर्वांनी जपली पाहिजे. बारामती सहकारी बँक ही केवळ एक बँक नाही, तर बारामतीकरांचा विश्वास आहे,” असे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

“आदरणीय अजितदादांप्रमाणेच मी आपल्या सर्वांच्या सोबत उभी आहे,” अशी ग्वाहीही त्यांनी सभासदांना दिली.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक आवाहन करताना पुष्पगुच्छ व सत्कार स्वीकारू नयेत तसेच पाण्याचा जपून वापर करावा,असे आवाहन केले.

यावेळी बँकेचे पदाधिकारी, संचालक, सभासद तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *