Headlines

सोमेश्वरचा होणारा चेअरमन हा नाव गाजवणारा नसेल तर, महाराष्ट्रात भाव गाजवणारा असेल! – उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार

सोमेश्वर कुणा एकाची खासगी मालमत्ता नाही; हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा कारखाना” – सुनेत्रा पवार

“दादांच्या कुटुंबाच्या निर्णयाविरोधात लढायचे असेल तर स्वतःच्या कर्तृत्वावर लढा” – सुनेत्रा पवार

“जेथे दादा होते, तेथे वहिनीव असतीलच; शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभी राहीन” – सुनेत्रा पवार

सोमेश्वर कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासाची संस्था; दादांनी दिलेल्या दिशेनेच कारखाना पुढे नेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार

सोमेश्वरनगर – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात नारळ फोडून झाला. यावेळी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार म्हणाल्या की, “आदरणीय लोकनेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाला आपण दिलेला प्रचंड प्रतिसाद माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.”

“सोमेश्वर साखर कारखाना हा केवळ एक कारखाना नाही, तर हजारो शेतकरी सभासदांचा विश्वास आहे. अनेक पिढ्यांपासून शेतकऱ्यांनी ही संस्था जपली आहे. बळीराजा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी ही संस्था आहे,” असे त्यांनी सांगितले.

अजितदादांच्या कार्याची आठवण करून देताना त्या म्हणाल्या, “दादांच्या जाण्याने इथला बांध, न बांध, शेती आणि परिसर सुना झाला आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीत दादांचा श्वास होता. दादा स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्यासाठी काय केले पाहिजे, याची त्यांना जाणीव होती.”

“१९९२ मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दादांनी कारखान्याची जबाबदारी स्वीकारली. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी कारखाना उभा केला. कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी त्यांनी आपली आमदारकी पणाला लावली. तब्बल ३४ वर्षे त्यांनी सोमेश्वर कारखान्यासाठी जीवाचे रान केले,” असेही त्यांनी नमूद केले.

“दादांनी कधीही आपल्या कामाचे गुणगान केले नाही. त्यांना फक्त काम करणे माहीत होते. कोणतेही मोठे काम एका दिवसात होत नाही. ३४ वर्षे त्यांनी या कारखान्यासाठी दिली. त्यामुळे आता निर्णय घेताना शेतकऱ्यांनी या कामाचा विचार करणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.

सोमेश्वर परिसरातील पाण्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, “सोमेश्वर परिसरातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडू नये यासाठी दादांनी जनाई-शिरसाई आणि पुरंदर उपसा योजनेसारख्या महत्त्वाच्या योजना पुढे नेल्या. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत झाली.”

“दादांच्या दूरदृष्टीमुळे सोमेश्वर कारखाना शेतकऱ्यांना सर्वोच्च दर देऊ शकला. आज कारखान्याने मिळवलेले यश हे दादांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापुढील काळातील जबाबदारीबाबत बोलताना श्रीमती पवार म्हणाल्या, “दादांची जबाबदारी मी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी आणि कारखान्याच्या प्रत्येक अडचणीसाठी मी खंबीरपणे उभी आहे. कोणतीही अडचण आली तरी दादांप्रमाणेच प्रत्येक बाबतीत आपल्या पाठीशी उभी राहीन, हा शब्द देते.”

“अजितदादांनी दिलेल्या दिशेनेच आपण पुढे जायला हवे. सोमेश्वर कारखाना कुणा एका व्यक्तीची वैयक्तिक मालमत्ता नाही. ही संस्था सभासदांच्या विश्वासातून उभी राहिली आहे. कारखान्याच्या यशाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीचे नसून हजारो सभासद आणि शेतकऱ्यांचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट केले की, “ही निवडणूक कुण्या एका व्यक्तीचा पराभव करण्यासाठी किंवा गटबाजीसाठी नाही, तर शेतकरी हितासाठी आहे. निर्णय घेताना व्यक्तीपेक्षा काम पाहा आणि आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष काम पाहा.”

उमेदवारी निवडीच्या प्रक्रियेबाबत त्या म्हणाल्या, “पक्षाच्या पद्धतीप्रमाणे सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर निरीक्षक नेमण्यात आले. सर्वांच्या भावना आणि मतांचा विचार करून सर्वसमावेशक संचालक मंडळ तयार करण्यात आले आहे. सहकारात सगळ्यांना सोबत घेऊन चालणे म्हणजेच सहकार. ‘माझे एकट्याचेच ऐका’ असे सहकारात चालत नाही.”

“ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र सहकाराची परंपरा आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे हीच आमची भूमिका आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अजितदादांच्या कुटुंबाच्या भूमिकेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “माझा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे आदरणीय दादांचे नाव वापरण्याची गरज नाही. जर कोणाला दादांच्या कुटुंबाच्या निर्णयाविरोधात जाऊन निवडणूक लढवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी. दादांच्या नावाचा वापर करायचा आणि त्यांच्याच कुटुंबाला बदनाम करायचे, हे योग्य नाही आणि हे चालणार नाही.”

“दादांनी ज्या विश्वासाने हा कारखाना जपला, त्याच विश्वासाने दादांनंतरही मी हा कारखाना जपणार आहे. संचालक मंडळातील २१ जणांना विश्वासात घेऊनच चेअरमनची निवड केली जाईल, हा शब्द मी आपल्याला देते,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

शेवटी त्यांनी सभासद आणि शेतकऱ्यांना आवाहन करताना “अजितदादांनी दाखवलेल्या विकासाच्या दिशेने सोमेश्वर कारखाना पुढे नेण्यासाठी सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा,” असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *