‘शेवटपर्यंत वाट पाहिली,पण जगतापांच्या मनात वेगळंच होतं’; पुरुषोत्तम जगतापांच्या भुमिकेवर स्पष्टच बोलले..
बारामती – “शेवटच्या दिवसापर्यंत मला वाटत होतं की आपण सगळे एकत्र बसून काहीतरी मार्ग काढू. पण जगतापांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.दादांचं कुटुंब म्हणजे आपण सगळेच आहोत.मात्र, आम्हा सगळ्यांना जगतापांनी डावललं,” असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी केला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जय पवार यांनी स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या राजकीय वाटचालीबाबतही भूमिका स्पष्ट केली.
“दादांचा अपघात झाला, त्यावेळी त्यांच्याजवळ जनतेच्या कामांचीच कागदपत्रं होती.शेवटच्या क्षणापर्यंत ते जनतेसाठीच काम करत होते.दादा गेल्यानंतर मी खूप विचार केला. राजकारण सोडावं, आईला वेळ द्यावा,असंही मनात आलं होतं.पण त्या १३ दिवसांत दादांवर जनतेचं किती प्रेम आहे,हे आम्ही जवळून पाहिलं.त्यानंतर ठरवलं की शेवटच्या क्षणापर्यंत जनतेसाठीच काम करायचं,” असं जय पवार म्हणाले.
“आपण दादांचे वारस आहोत. त्यांचं रक्त आपल्या शरीरात आहे. त्यामुळे जनतेसाठी जगायचं आणि दादांनी आयुष्यभर जपलेला जनसेवेचा विचार पुढे न्यायचा,हा आमचा निर्धार आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकत्र येण्याची चर्चाही झाली होती
काही दिवसांपूर्वी सुप्रिया आत्यांच्या घरी बहिण रेवतीला भेटण्यासाठी गेलो असताना सोमेश्वर कारखाना निवडणुकीबाबत एकत्र येण्याची चर्चा झाली होती,अशी माहिती जय पवार यांनी दिली.
“युगेंद्र पवार यांनीच सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का,अशी भूमिका मांडली होती. त्यावेळी पार्थदादांनी स्पष्ट सांगितलं की, ‘युगेंद्र, आमचे कार्यकर्ते आम्हाला असं करू नका,असं सांगत आहेत. हे कार्यकर्ते आमच्यासाठी झटतात, त्यामुळे आम्हाला त्यांचं ऐकावं लागतं.’ त्यानंतरही आम्ही शेवटपर्यंत काहीतरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा ठेवली होती,” असं जय पवार यांनी सांगितलं.
‘माळेगाव कारखाना ७० कोटींच्या तोट्यात असल्याचा दावा; जय पवारांचा पलटवार’
माळेगाव कारखान्याच्या आर्थिक स्थितीवरून युगेंद्र पवार यांनी केलेल्या आरोपांवरही जय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “दादा गेल्यानंतर माळेगाव कारखान्याचं ७० कोटी रुपयांचं नुकसान झालं, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं. त्यानंतर मी या विषयाची माहिती घेतली.मात्र,कारखाना दोन कोटी रुपयांच्या नफ्यात असल्याची माहिती माझ्यासमोर आली,” असेही जय पवार यांनी स्पष्ट केले.
“निवडणूक लढवायची असेल तर जरूर लढवा; पण वस्तुस्थितीच्या आधारावर लढा.उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू नका. सभासद आणि शेतकरी सुज्ञ आहेत.त्यांना काय खरं आणि काय खोटं, हे चांगलं कळतं.त्यामुळे सत्य फार काळ लपवता येणार नाही,” असा इशारा जय पवार यांनी दिला.
‘सभासदांचं हित हाच मुख्य मुद्दा’
सोमेश्वर कारखाना हा सभासद आणि शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला कारखाना आहे.त्यामुळे निवडणुकीत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सभासदांचं हित, शेतकऱ्यांचा फायदा आणि कारखान्याचा विकास हेच महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत, अशी भूमिका जय पवार यांनी मांडली.
“ही निवडणूक कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. कारखाना आणि सभासदांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचा आहे. शेवटी निर्णय सभासदच घेतील,” असं जय पवार यांनी नमूद केलं.
