पोलिसांच्या तांत्रिक कौशल्याचा वापर: देशमुख हत्या प्रकरणातील दोन आरोपींना अटक

Photo of author

By Sandhya


पुणे : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींमधील दोघांना पोलिसांनी पकडलं आहे. मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे गेल्या महिनाभरापासून फरार होते. अखेर पोलिसांना या आरोपींना पकडण्यात यश आले आहे. वाल्मिक कराड पाठोपाठ आता हत्या करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतल्याने तपासाला गती येणार आहे. खुनातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलीसाचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते. डॉ. संभाजी वायभसे याची चौकशी करुन गोपनीय माहितगार नेमत आणि तांत्रिक कौशल्याचा उपयोग करुन सुदर्शन चंद्रभान घुले वय 26 रा.टाकळी ता.केज आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे वय 23 रा. टाकळी ता.केज यांना ताब्यात घेतलं आहे. आता या आरोपींना गुन्हे अन्वेषण विभाग बीडचे अनिल गुजर, पोलीस उप अधीक्षक यांच्या ताब्यात देणयात आलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांना आधी पोलिसांनी अटक केली होती. तीन आरोपी फरार होते, यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे फरार होते. यामधील आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांना अटक केलीय. मात्र कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून मुख्य आरोपी फरार होते. पुण्यामध्ये सापडलेल्या आरोपींची पोलिसांना आधी कशी माहिती मिळाली नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
३१ डिसेंबरला वाल्मिक कराड याने पुण्यातील मुख्यालयामध्ये सरेंडर केले होते. त्यानंतर त्याला १४ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. आता कराडची चौकशी सुरू असताना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक झाल्याने आता सीआयडी आणि एसआयटीलाही या प्रकरणाच्या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे पडसाद विधानसभा अधिवेशनातही पाहायला मिळाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा केली. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page