काल वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेले एक्झिट पोल हे खरे नाहीत. दहा पैकी आठ लोकांना विचारल्यास ते मोदी सरकारवर खुश नाहीत. त्यामुळे हे भाजपा सरकार नक्कीच बदलेल.
तसेच पक्ष फोडणाऱ्यांना जनता नक्कीच धडा शिकवेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला.
गेल्या दोन वर्षात राज्यात सुरू असलेल्या पक्ष फोडा -फोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. कुणाचा पक्ष तर कुणाचे घर फोडले, कुणाच्या घराचे दरवाजे काढून नेले.
पक्ष पळवायचा, चिन्ह पळवायचे, आमच्याही घराची खिडकी काढून नेली अशा पद्धतीने हे सर्व घाणेरडे राजकारण बघून जनता कंटाळली असून निश्चितच पक्ष फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना या लोकसभा निवडणुकीत जनतेने धडा शिकविला आहे. असेही मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
प्रत्यक्ष या निवडणुकीचे निकाल येतील, तेव्हा त्याची खात्री पटलेली असेल. राज्यात भाजप -शिवसेना युतीला दूर करत महाविकास आघाडीला 35 पेक्षा अधिक जागा मिळालेल्या असतील. देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
देशातील बेरोजगार तरुण, शेतकरी, सर्वसामान्य जनता नाराज असल्याने त्यांनी निश्चितच राज्यात आणि देशात परिवर्तनाच्या दिशेने कौल दिला आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
एक्झिट पोल मध्ये दाखवण्यात येणारे आकडे हे सरकारच्या सोयीचे असून प्रत्यक्षात मतदानाचे निकाल येतील तेव्हा ते मोदी सरकार विरोधात असेल असेही ते म्हणाले.