Headlines

कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरविण्यासाठी सर्वंकष नियोजन करा” — पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६ अधिक भव्य, दर्जेदार आणि पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित, दर्जेदार आणि आनंददायी अनुभव मिळेल, याची विशेष काळजी घेण्यात यावी,” असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

मुंबईतील मेघदूत या शासकीय निवासस्थानी कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६ च्या अंतिम तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे (भा.प्र.से.), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे (भा.प्र.से.), पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे (भा.प्र.से.), उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुख्य प्रशासकीय अधिकारी जितेंद्र सोनवणे, सहसंचालक संतोष जाधव, सहाय्यक संचालक रविंद्र पवार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी, सातारा पोलिस अधीक्षक, सातारा उप वनसंरक्षक, वाई-महाबळेश्वर उपविभागीय अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ख्रिसमस ते नववर्ष या कालावधीत देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक कोयना परिसराला भेट देण्याची शक्यता लक्षात घेऊन महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. पर्यटकांची सुरक्षितता, निवास व्यवस्था, वाहतूक नियोजन, पर्यटन सुविधा, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा तसेच संपूर्ण व्यवस्थापनामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, अशा स्पष्ट सूचना मंत्री श्री. देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्न कोयना परिसराची ओळख देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या समन्वयातून विविध दर्जेदार आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या माध्यमातून कोयना परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, जलपर्यटन आणि स्थानिक पर्यटन क्षमतांना व्यापक प्रसिद्धी मिळण्यास मदत होणार आहे.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, वन विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. पर्यटकांना कोणतीही गैरसोय होणार नाही आणि संपूर्ण महोत्सव सुरक्षित, सुबक व उत्कृष्ट नियोजनाचा आदर्श ठरेल, यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

कोयना परिसरातील पर्यटनाला चालना देतानाच स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित घटकांना या महोत्सवाचा लाभ मिळेल, यादृष्टीनेही नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *