वनविभाग बारामती व बचाव पथकाच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाची सांगता
बारामती, दि. ९ : वनविभाग व बचाव पथक बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाच्या सांगता समारंभाचे आयोजन सुपे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्प, पक्षी व इतर वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रेस्क्यू पथकाचे श्रेयस कांबळे यांनी ‘वन्यजीव सहजीवन व वन्यजीव संरक्षण’ या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. सर्पांच्या विविध जाती, सर्पदंशाबाबत घ्यावयाची काळजी, पक्षी व त्यांच्या पिलांची निगा, तसेच जखमी किंवा निराधार वन्यप्राण्यांना आढळल्यास करावयाची कृती याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
वन्यजीव बचाव प्रक्रियेची माहितीही देण्यात आली.
वन्यजीवांबाबतचे गैरसमज दूर करून मानव आणि वन्यजीव यांच्यातील सहजीवनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. यावेळी वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित निबंधलेखन व चित्रकला स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे व श्रीमती शीतल फुंदे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात शाळेतील एकूण २६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल, सुपे येथील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन, सर्प व इतर वन्यप्राण्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि मानव-वन्यजीव सहजीवनाची भावना रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच वनरक्षक, वनसेवक उपस्थित होते.
००००
