तालुक्यातील मौजे बऱ्हाणपूर व मोरगाव येथे दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या संभाव्य पीक नुकसानीची अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी शेतावर जाऊन पाहणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके उपस्थित होते. बऱ्हाणपूर येथे तूर व कांदा पिकांची, तर मोरगाव येथे बाजरी व सूर्यफूल पिकांची पाहणी करून शेतीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, दुष्काळी परिस्थितीचा पिकांवर झालेला परिणाम, पाण्याची उपलब्धता तसेच शेती करताना शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत माहिती जाणून घेण्यात आली. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची परिस्थिती समजून घेत संभाव्य पीक नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली.
यावेळी उंडवडीचे मंडळ अधिकारी चेतन पोळ मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, मोरगाव मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी कृषी सहायक, महसूल सेवक, शेतकरी उपस्थित होते.
