Headlines

महापौर निवासस्थानी नवरात्री निमीत्त प्रथमच विशेष वंचित मुलींचे कन्यापूजन आणि भोंडल्याचे आयोजन

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून सामाजिक संवेदनशीलतेचा अनोखा उपक्रम; मुलींच्या चेहऱ्यावर फुलला आनंद, उपस्थित महिला भावुक

समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, तसेच त्यांच्या मुलांनाही आनंदी बालपणाचा अनुभव घेता यावा, या संवेदनशील भावनेतून पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून महापौर निवासस्थानी प्रथमच विशेष मुलींसाठी कन्यापूजन आणि पारंपरिक भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी, महिला सन्मान आणि माणुसकीचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमातून समाजातील वंचित मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. विशेषतः देहविक्रय करणाऱ्या महिलांना सन्मानाचे जीवन मिळावे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेता यावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जातात. मात्र, या महिलांच्या मुलांनाही अनेकदा सामाजिक स्वीकार, समान संधी आणि बालपणातील आनंदाच्या क्षणांपासून वंचित राहावे लागते. या मुलींच्या भावविश्वाचा विचार करून, त्यांनाही सण-उत्सवांमध्ये सहभागी होता यावे, प्रेम आणि आपलेपणाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने महापौर मंजुषा नागपुरे यांनी या विशेष उपक्रमाची संकल्पना मांडली.

नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलींसह स्वाधार मोहोर बालगृहातील, न्यायालयाच्या ताब्यातून संस्थेकडे सोपविण्यात आलेल्या मुलींना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. महापौर निवासस्थानी या मुलींचे आपुलकीने स्वागत करून पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन करण्यात आले. त्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्वतः या मुलींसोबत पारंपरिक भोंडल्यात सहभागी होत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण व्यतीत केले.

समाजातील प्रत्येक मुलीला सन्मान, प्रेम आणि आपलेपणाची जाणीव मिळणे हा तिचा अधिकार आहे. मात्र, सामाजिक परिस्थितीमुळे अनेक मुलींना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन महापौर निवासस्थानी प्रथमच अशा स्वरूपाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश केवळ कन्यापूजन किंवा पारंपरिक भोंडला साजरा करणे एवढाच मर्यादित नसून, या मुलींना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे, त्यांच्याविषयी आपुलकीची भावना निर्माण व्हावी आणि त्यांनाही आनंदी बालपण अनुभवता यावे, हा व्यापक दृष्टिकोन त्यामागे होता.

कार्यक्रमात मुलींनी भोंडल्याच्या पारंपरिक गाण्यांमध्ये आणि खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. महापौरांनी स्वतः त्यांच्यासोबत वेळ घालविल्यामुळे मुलींना विशेष आनंद झाला. “आम्हाला पहिल्यांदाच महापौर निवासस्थानी अशा कार्यक्रमासाठी बोलावले. मंजुषाताईंनी आमच्यासोबत भोंडला खेळला आणि आमचे पूजन केले. याचा आम्हाला खूप आनंद झाला,” अशा भावना मुलींनी व्यक्त केल्या. त्यांच्या या निरागस प्रतिक्रिया आणि चेहऱ्यावरील आनंदाने उपस्थितांचे मन जिंकले.

या प्रसंगी स्वाधार मोहोर बालगृहातील महिला कर्मचारी तसेच उपस्थित महिला भावुक झाल्या. मुलींना मिळालेला सन्मान, त्यांच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण आणि त्यांच्या मनात निर्माण झालेली आपलेपणाची भावना यामुळे अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. सामाजिक परिस्थितीमुळे दुर्लक्षित राहिलेल्या या मुलींना महापौर निवासस्थानी सन्मानाने आमंत्रित करून त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा हा अनुभव उपस्थितांसाठीही भावनिक आणि संस्मरणीय ठरला.

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाने सामाजिक संवेदनशीलतेचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. समाजातील वंचित घटकांसाठी काम करताना केवळ त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे पुरेसे नसून, त्यांच्या मुलांनाही प्रेम, सन्मान, सुरक्षितता, समान संधी आणि आनंदी बालपण मिळावे, यासाठी प्रयत्न करणे तितकेच आवश्यक आहे. सामाजिक परिस्थिती कोणतीही असली, तरी प्रत्येक मुलीला सन्मानाने जगण्याचा आणि समाजात आपले स्थान निर्माण करण्याचा समान अधिकार आहे, ही भावना या कार्यक्रमातून अधोरेखित झाली.

समाजातील प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, तिला आपलेपणाची जाणीव व्हावी आणि सामाजिक परिस्थितीमुळे तिच्या बालपणातील आनंद हिरावला जाऊ नये, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम महापौर निवासस्थानातील एक हृदयस्पर्शी अनुभव ठरला.

“प्रत्येक मुलगी ही सन्मान, प्रेम आणि आनंदाची हक्कदार आहे. तिची सामाजिक पार्श्वभूमी कोणतीही असो, तिला आपलेपणाने स्वीकारणे आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे,” हा माणुसकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.