चार घरफोडीचे गुन्हे उघड; सोन्याचे दागिने, चांदी, दोन लाखांची रोकड, कार आणि वॉकीटॉकी जप्त
जुन्नर, प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि नारायणगाव परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन मुख्य आरोपींसह चोरीचे चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या टोळीकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. तसेच ओतूर आणि नारायणगाव परिसरात अशाच प्रकारच्या घरफोड्या झाल्याने पोलिसांनी या घटनांचा गांभीर्याने तपास सुरू केला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना संशयित कार आढळून आली. या कारचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ओतूरपासून नाशिकपर्यंत सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यानंतर नाशिकमधील इंदिरानगर आणि वडाळा परिसरात गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी कार नाशिकमधील वडाळा परिसरात राहणारा सोनू उर्फ शरीफ रसूल शेख वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्यासोबत वसीम पठाण आणि अदनान पठाण हे दोघेही असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांच्या पथकाने वडाळा व लासलगाव परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वसीम मुनीर पठाण (वय २९), अदनान युनूस पठाण (वय २६) आणि सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख (वय ४०) यांचा समावेश आहे. हे तिघेही नाशिक जिल्ह्यातील लासलगाव परिसराशी संबंधित आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
३८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून चोरीस गेलेले १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन किलो ७७० ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख आणि गुन्ह्यांसाठी वापरलेली कार असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा करताना पकडले जाऊ नये, यासाठी आरोपींनी वापरलेले वायरलेस वॉकीटॉकीही पोलिसांनी जप्त केले आहेत.
तसेच चोरीचे चांदीचे दागिने खरेदी करणारा सागर अशोक शिंदे (वय ३०, रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) यालाही अटक करण्यात आली आहे.
चार घरफोडीचे गुन्हे उघड
या कारवाईत ओतूर पोलीस ठाण्यातील तीन आणि नारायणगाव पोलीस ठाण्यातील एका अशा एकूण चार घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. यामध्ये ओतूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २६५/२०२६, २१८/२०२६ आणि १३७/२०२६ तसेच नारायणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २०३/२०२६ यांचा समावेश आहे.
सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, या गुन्ह्यांचा पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार दीपक साबळे, पोलीस अंमलदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, भारत मोहोळ, चेतन पाटील तसेच ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नरेंद्र गोराणे, बाळशिराम भवारी, विशाल गोडसे आणि धनंजय पालवे यांनी सहभाग घेतला.
