Headlines

रविवार पेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार!

व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेत महापौर मंजुषा नागपुरे यांचा ठोस उपाययोजनांचा निर्धार; अतिक्रमणमुक्त व सुरक्षित बाजारपेठेसाठी प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश!!

रविवार पेठ परिसरातील अतिक्रमणाच्या समस्येवर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या धडक कारवाईचे व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी स्वागत केले. यानिमित्त रविवार पेठ व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापौर कार्यालयात महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले तसेच महापौर आणि महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन केले.

या भेटीदरम्यान व्यापाऱ्यांनी बाजारपेठेतील विविध समस्यांकडे महापौरांचे लक्ष वेधले. अधिकृत दुकानांसमोर अनधिकृतपणे भाजीपाला व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून होणारी अडवणूक व दादागिरी, अतिक्रमणविरोधी कारवाईची पूर्वसूचना मिळवून कारवाईपूर्वी अतिक्रमण हटविणे आणि पथक गेल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करणे, अशा प्रकारांमुळे अधिकृत व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. यापूर्वी केवळ तात्पुरत्या स्वरूपात होणाऱ्या कारवाईऐवजी आता प्रभावीपणे झालेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या गांभीर्याने समजून घेत बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न केवळ एका दिवसाच्या कारवाईपुरता मर्यादित न ठेवता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची भूमिका स्पष्ट केली. अधिकृत व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला कोणताही त्रास होणार नाही, पादचाऱ्यांसाठी पदपथ आणि नागरिकांसाठी रस्ते मोकळे राहतील, तसेच अनधिकृत अतिक्रमण पुन्हा होणार नाही यासाठी प्रशासनाने नियमित देखरेख व प्रभावी कार्यवाही करावी, यासाठी आवश्यक निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

पुणे शहरातील ऐतिहासिक बाजारपेठांचे व्यावसायिक महत्त्व जपत व्यापारी, ग्राहक आणि नागरिक या सर्वांसाठी सुरक्षित, स्वच्छ, सुव्यवस्थित आणि अतिक्रमणमुक्त वातावरण निर्माण करणे हे महानगरपालिकेचे प्राधान्य आहे. रविवार पेठेसह शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासनाची कारवाई सातत्याने सुरू राहील, असा ठाम विश्वास महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी व्यक्त केला.