लासुर्णे : बारामती – इंदापूर मार्गावरील लासुर्णे गावातून जाणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने वाहतुकीची समस्या कायम आहे. या परिसरात चारपदरी रस्त्याचे काम पेंडिंग असल्याने सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे.
त्यातच दर बुधवारी लासुर्णे येथे आठवडे बाजार भरत असल्याने वाहतुकीच्या समस्येत आणखी भर पडत आहे. रस्त्यालगतच बाजार भरत असल्यामुळे विक्रेते, ग्राहक आणि वाहनांची मोठी गर्दी होते. एकेरी वाहतूक आणि रस्त्यालगतचा आठवडे बाजार यामुळे बुधवारी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच बुधवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र वाहतूक नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे.
