
२० महिन्यांपासून वेतन प्रलंबित; सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता, ग्रॅच्युइटी व इतर मागण्यांसाठी तंत्रशिक्षण विभागाच्या पुणे कार्यालयासमोर निदर्शने व धरणे आंदोलन
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या विविध कॅम्पसमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे व्यवस्थापन तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता, सेनापती बापट रोड, पुणे येथील तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीअंतर्गत नरे, कोंढवा, लोणावळा व वडगाव येथील कॅम्पसमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. विशेषतः अनेक कर्मचाऱ्यांचे २० महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचे वेतन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाचा लाभ मिळत नाही. तसेच सध्या सातव्या वेतन आयोगानुसार लागू असलेला महागाई भत्ता ६२ टक्के असताना संबंधित कर्मचाऱ्यांना केवळ ४ टक्के महागाई भत्ता देण्यात येत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यातही वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तसेच निवृत्त झालेल्या अथवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, थकीत वेतन व इतर देय रकमा अद्याप मिळालेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रजा शिल्लक असतानाही त्यांना रजा मंजूर न करता Without Pay करण्यात येत असल्याची तसेच रजेचे रोखीकरणही केले जात नसल्याची तक्रार आहे.
या प्रश्नांबाबत वारंवार निवेदने, चर्चा व पाठपुरावा करूनही व्यवस्थापन आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नरे, कोंढवा व लोणावळा कॅम्पसमधील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भारतीय मजदूर संघाचे सभासदत्व स्वीकारून संघटितपणे आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरू केला आहे. कोंढवा व नरे येथे कामगारांचा संप सुरू असून लोणावळा येथेही यापूर्वी संपाचे आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या आंदोलनाची शासन व व्यवस्थापनाने अपेक्षित दखल घेतलेली नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा
उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित वेतन व कायदेशीर देणी तातडीने अदा करण्याचे आदेश द्यावेत, तसेच सातव्या वेतन आयोगानुसार वेतन व महागाई भत्त्याचा लाभ देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.
दि. २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात नरे, कोंढवा व लोणावळा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावेळी संघटनेच्या वतीने उच्च शिक्षण संचालक व तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार असून प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले की, “कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला आणि कायदेशीर हक्क मिळणे हा त्यांचा मूलभूत न्याय्य अधिकार आहे. २० महिन्यांपेक्षा अधिक काळ वेतन प्रलंबित ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. शासनाने आणि व्यवस्थापनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. आंदोलनानंतरही ठोस निर्णय न झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शांततामय, लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना शेवटपर्यंत संघर्ष करेल, असा इशाराही भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.
मा. संपादक महोदय,
उपरोक्त वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रसिद्ध करावी ही विनंती .
आपला,
सचिन मेंगाळे
उपाध्यक्ष, भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश
मो. ९४२२०३७०२९
