बारामती : बारामती विमानतळावर आज दुपारी शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान खाली उतरत असताना रनवेवरून घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजता कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे विमान बारामती विमानतळावर उतरत होते. त्याचवेळी विमानाचा ताबा सुटून ते रनवेच्या बाहेर घसरले. विमानतळ परिसरातच ही घटना घडल्याने तातडीने संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनाही बारामती इथं झालेल्या विमान अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनं फक्त बारामतीच नव्हे तर संपूर्ण राज्य सुन्न झाले होते. या विमान दुर्घटनेची चौकशी पूर्ण झालेली नसतानाच अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज विमानतळावर घडलेल्या या दुर्घटनेप्रकरणी सखोल तपासानंतरच दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
