बारामती, दि.४: रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य अभियानांतर्गत तालुक्यातील २२०० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर ज्वारीचे मिनिकिट मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेमुळे रब्बी हंगामातील ज्वारीच्या उत्पादनवाढीला चालना मिळणार असून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे. या मिनिकिटमध्ये उत्तम वाणाचे रब्बी ज्वारीचे बियाणे, बीजप्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते तसेच कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत फुले यशोमती आणि परभणी सुपर मोती या सुधारित वाणांच्या ज्वारी बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. केवळ बियाणेच नव्हे, तर पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक निविष्ठा आणि तांत्रिक मार्गदर्शनही शेतकऱ्यांना मिळणार आहे.
पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व वाढविणे, ज्वारीचे क्षेत्र व उत्पादन वाढविणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
बारामती तालुक्यातील २२०० शेतकऱ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.
०००
