कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; आतापर्यंत २०.७२ लाख शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभार्थी
वालचंदनगर : राज्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा चौथा टप्पा नुकताच वितरित करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते राज्यातील ४ लाख ८६ हजार ७५७ पात्र शेतकऱ्यांना ४ हजार ७६४ कोटी ७७ लाख रुपयांच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण करण्यात आले.
या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यासह राज्यातील शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील प्रश्नांना प्राधान्य देत शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील २० लाख ७२ हजार २५० पात्र शेतकऱ्यांना एकूण १८ हजार ४० कोटी २१ लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होऊन त्यांना आगामी हंगामासाठी नव्या उमेदीने शेती करण्यास मदत होणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या आर्थिक दिलाशामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, शेतीला बळकटी देणे आणि कृषी क्षेत्राचा विकास साधणे या उद्देशाने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी मंत्रिमंडळातील अन्य सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.इंदापूरच्या शेतकरी बांधवांसाठीही हा निर्णय महत्त्वपूर्ण असून कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या योजनांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
