Headlines

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी!

पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती;चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या चार आरोपींविरुद्ध दरोडा,खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी,खंडणी व मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यांची पूर्व नोंद!

बारामती – कुस्तीच्या तालमीत लाल मातीचा आखाडा असतो; मात्र बारामती शहरातील शिवाजीनगर,कसबा परिसरातील एका कुस्तीच्या तालमीमध्ये याच लाल मातीखाली लपवून ठेवलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे.पूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी काही इसमांनी धारदार शस्त्रे गोळा करून गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्याची तयारी केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये चार धारदार लोखंडी कोयते व एक तलवार अशी एकूण पाच घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून,मा.न्यायालयाने त्यांना दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

बारामती शहरातील खंडोबानगर, शिवाजीनगर,कसबा व परिसरात घडणाऱ्या मारामारी,धमकावणे, दहशत निर्माण करणे आणि बेकायदेशीर शस्त्रांच्या वापरासारख्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी बारामती शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.याच मोहिमेदरम्यान दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती विभाग,श्री.चैतन्य वसंतराव कदम यांना विश्वासू गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली.काही इसमांनी पूर्वीच्या वादातून कोणावर तरी हल्ला करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रे गोळा केली असून,ती जामदार रोड,कसबा, बारामती येथील शिवाजीनगर गणेश मंदिराशेजारील कुस्तीच्या तालमीत लपवून ठेवली असल्याची माहिती होती.सदर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या.

मा.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले.पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित कुस्तीच्या तालमीमध्ये शोधमोहीम राबविली.यावेळी तालमीतील लाल मातीमध्ये लपवून ठेवलेले चार धारदार लोखंडी कोयते व एक तलवार अशी एकूण पाच शस्त्रे मिळून आली.पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत कायदेशीर पंचनामा करून सदर शस्त्रे जप्त केली. कुस्तीच्या सरावासाठी वापरल्या जाणाऱ्या तालमीमध्ये अशा प्रकारे घातक शस्त्रे लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाल्याने या शस्त्रांचा मूळ स्रोत,त्यांची साठवणूक आणि संभाव्य वापरामागील उद्देश याबाबत तपास सुरू करण्यात आला.

सदर कारवाईच्या अनुषंगाने पाच संशयित इसमांची चौकशी सुरू करण्यात आली होती.याप्रकरणी पोलीस शिपाई श्री.गिरीश गणपत नेवसे,बक्कल क्रमांक ४७८,यांनी दिलेल्या सरकारतर्फे फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९८/२०२६, शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ४ सह २५(१-ब)(ब) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १२२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील तपासादरम्यान उपलब्ध पुरावे,आरोपींच्या सहभागासंबंधी प्राप्त माहिती आणि अटकेची कायदेशीर आवश्यकता विचारात घेऊन चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या पूर्व गुन्हेगारी अभिलेखांची माहिती प्राप्त केली असता त्यांच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा,जबरी चोरी,खुनाचा प्रयत्न, खंडणी,अपहरण,मारहाण,धमकी तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची नोंद आढळून आली आहे.

अटक करण्यात आलेला पहिला आरोपी योगेश उर्फ धन्या गोकुळ कांबळे,रा.जामदार रोड,कसबा, बारामती याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१६/२०१७, भा.दं.वि. कलम ३९५ अन्वये दरोड्याचा गुन्हा; गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९/२०१८, भा.दं.वि. कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ४११, ३४ अन्वये जबरी चोरी, मारहाण,शिवीगाळ व धमकीसंबंधी गुन्हा दाखल आहे.तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४/२०१८, भा.दं.वि.कलम ३९४, ३४ अन्वये दुखापत करून जबरी चोरीचा गुन्हा आणि गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०६/२०१८, भा.दं.वि. कलम ३९५ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाचे कलम ३(१)(ii), ३(४) अन्वये गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे. अशा प्रकारे सदर आरोपीविरुद्ध चार पूर्व गुन्ह्यांची माहिती उपलब्ध आहे.

दुसरा आरोपी आदेश संजय कुचेकर,रा. साठेनगर,कसबा,बारामती याच्याविरुद्ध वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९०/२०२०, भा.दं.वि. कलम ३९५, ३९२, ३६३ अन्वये दरोडा, जबरी चोरी व अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२०२२, भा.दं.वि. कलम ३२४, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये मारहाण, अडवणूक व धमकीचा गुन्हा; गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२९/२०२२, भा.दं.वि. कलम ३०७, ३८४, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ४२७, ५०४, ५०६, १२०(ब), ३८७ सह शस्त्र अधिनियमाचे कलम ४, २५, फौजदारी कायदा सुधारणा अधिनियमाचे कलम ७ आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाचे कलम ३(१)(ii), ३(४) अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.याशिवाय बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २५२/२०२१, भा.दं.वि. कलम ३२४, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे. सदर आरोपीविरुद्ध एकूण चार पूर्व गुन्ह्यांची माहिती उपलब्ध असून, त्यामध्ये खुनाचा प्रयत्न,दरोडा, खंडणी,अपहरण आणि मोक्का कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

तिसरा आरोपी ऋषिकेश उर्फ पप्पू अनिल चंदनशिवे,रा.साठेनगर, कसबा,बारामती याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२९/२०२२, भा.दं.वि. कलम ३०७, ३८४, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ४२५, ४२७, ५०४, ५०६, ३४ सह शस्त्र अधिनियमाचे कलम ४, २५ आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल असून,सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९०/२०२०, भा.दं.वि. कलम ३९५, ३९२, ३६३ अन्वये दरोडा, जबरी चोरी व अपहरणाशी संबंधित गुन्ह्याची नोंद असून,सदर प्रकरणदेखील न्यायप्रविष्ट असल्याची माहिती आहे. त्याच्याविरुद्ध दोन पूर्व गुन्ह्यांची माहिती उपलब्ध आहे.

चौथा आरोपी अभिजीत प्रदीप शिंदे,रा.मळद,ता.बारामती,जि. पुणे याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६७/२०१८, भा.दं.वि. कलम ३९५, ३२३, ५०४, ५०६ अन्वये दरोडा,मारहाण,शिवीगाळ व धमकीचा गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे.

अशा प्रकारे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींविरुद्ध उपलब्ध माहितीनुसार एकूण ११ पूर्व गुन्ह्यांच्या नोंदी आहेत.यामध्ये दरोडा,जबरी चोरी,खुनाचा प्रयत्न, खंडणी,अपहरण,मारहाण,धमकी, शस्त्र अधिनियम आणि मोक्का कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.या पूर्व गुन्ह्यांची माहिती ही गुन्हे दाखल झाल्याबाबतची असून,संबंधित प्रकरणांतील दोषसिद्धी अथवा न्यायालयीन निष्कर्ष स्वतंत्र अभिलेखांनुसार निश्चित होतात.

अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना मा.न्यायालयासमोर हजर करून गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली. मा.न्यायालयाने सदर चार आरोपींना दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे.

या पोलीस कोठडीदरम्यान जप्त करण्यात आलेले चार धारदार कोयते व तलवार नेमकी कोठून व कोणाकडून प्राप्त करण्यात आली, त्यांची वाहतूक कोणी केली,शस्त्रे तालमीतील लाल मातीखाली कोणी व कोणाच्या सांगण्यावरून लपवून ठेवली,शस्त्रांच्या खरेदीसाठी किंवा प्राप्तीसाठी आर्थिक मदत कोणी केली, पूर्वीच्या वादातून कोणावर हल्ला करण्याचा उद्देश होता काय, त्याबाबत काही पूर्वनियोजन करण्यात आले होते काय,तसेच या प्रकरणात आणखी कोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे काय,या सर्व बाबींचा उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब,तांत्रिक माहिती व इतर कायदेशीर तपास साधनांच्या आधारे सखोल तपास करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे,कुस्तीच्या तालमीसारख्या ठिकाणी लाल मातीखाली धारदार शस्त्रे लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून सदर शस्त्रसाठा उघडकीस आणला.प्राप्त गोपनीय माहितीनुसार संभाव्य गंभीर हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन करण्यात आलेली ही कारवाई सार्वजनिक शांतता व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.तथापि,संभाव्य हल्ल्याचे नियोजन व त्यामधील प्रत्येक आरोपीचा सहभाग या बाबी अद्याप तपासाधीन आहेत.

सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण,श्री.संदीप सिंह गिल्ल (भा.पो.से.), मा.अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग,श्री.गणेश बिरादार,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग,श्री.चैतन्य वसंतराव कदम तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती मनीषा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री.टेळकीकर, पोलीस हवालदार श्री.रामचंद्र शिंदे, पोलीस हवालदार श्री.अभिजीत एकशिंगे,पोलीस शिपाई श्री. गिरीश गणपत नेवसे,पोलीस शिपाई श्री.सादिक काझी व पोलीस शिपाई श्री.अक्षय सिताफ यांनी सहभाग घेतला. गुन्हा नोंदणीची कार्यवाही पोलीस हवालदार श्री.बनसोडे,बक्कल क्रमांक १९३५, यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.सर्जेराव पुजारी करीत आहेत.

बारामती शहर व परिसरात बेकायदेशीर शस्त्रसाठा करणे, शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणे,मारामारी,धमकावणे, खंडणीसाठी दबाव आणणे किंवा गंभीर स्वरूपाचा अपराध करण्याच्या उद्देशाने शस्त्रे गोळा करणे अशा प्रकारांविरुद्ध बारामती शहर पोलिसांकडून विशेष कोम्बिंग ऑपरेशन,गोपनीय माहिती संकलन,संशयास्पद हालचालींची पडताळणी आणि कायद्यानुसार प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू आहे.

बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,आपल्या परिसरात कोणतीही व्यक्ती किंवा टोळके बेकायदेशीर कोयते,तलवारी,पिस्तूल अथवा अन्य घातक शस्त्रे बाळगत असल्यास,शस्त्रसाठा लपवून ठेवत असल्यास किंवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडविण्याची तयारी सुरू असल्याची विश्वासार्ह माहिती मिळाल्यास ती तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशनला कळवावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून गोपनीय ठेवण्यासाठी आवश्यक दक्षता घेतली जाईल. नागरिकांनी संशयित व्यक्तींना स्वतः सामोरे न जाता पोलिसांची मदत घ्यावी.आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडविलेला शस्त्रसाठा उघडकीस आणणारी ही कारवाई म्हणजे बेकायदेशीर शस्त्रसाठा व गंभीर गुन्ह्यांच्या संभाव्य तयारीविरुद्ध बारामती शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेतील महत्त्वाची कारवाई असून,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत.

पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन
पुणे ग्रामीण