बारामती, दि. ३०: आगामी दिवाळी सण २०२६ च्या पार्श्वभूमीवर बारामती उपविभागात शोभेची दारू व फटाके विक्री करण्यासाठी इच्छुक व्यावसायिकांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून परवाना घेणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी कळविले आहे.
फटाके विक्रीचा परवाना मिळविण्यासाठी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपविभागीय दंडाधिकारी, बारामती उपविभाग यांच्या कार्यालयात विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत १० रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. तसेच ज्या जागेत व्यवसाय करायचा आहे त्या जागेच्या मालकी हक्काचा उतारा किंवा जागा भाड्याने घेतली असल्यास मालकाचे संमतीपत्र सादर करावे.
जागेच्या सुरक्षिततेबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले प्रतिज्ञापत्रही जोडणे आवश्यक आहे.
याशिवाय पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक यांच्याकडून फटाके विक्रीच्या सुरक्षिततेबाबतचे प्रमाणपत्र, अर्जदारास शिक्षा झाली नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र तसेच दुकानाची जागा सुरक्षित असल्याबाबत आणि उर्वरित मालाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात विस्फोटक नियम २००८ व विस्फोटक कायदा १८८४ मधील तरतुदींचे पालन करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.
ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र, नगरपालिका हद्दीतील दुकानासाठी जागा दिल्याच्या पत्राची प्रत आणि मागील वर्षीच्या परवान्याची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. परवाना शुल्कापोटी ६०० रुपये शासकीय कोषागारात जमा करून त्याचे मूळ चलन अर्जासोबत जोडावे. इच्छुक फटाके विक्रेत्यांनी मुदतीचे पालन करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन बारामती उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
