वालचंदनगर पोलिसांची कामगिरी; इंदापूर तालुक्यातील कळस येथील घटनेचा उलगडा
वालचंदनगर : किरकोळ वादातून एका तरुणाच्या पोटात धारदार हत्यार खुपसून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. सुरज यंकप्पा पवार याच्यावर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मौजे कळस, तालुका इंदापूर येथे घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळस गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या कामगार वसाहतीमधील पाण्याच्या टाकीजवळ फिर्यादी व त्यांचे काही सहकारी असताना आरोपी मल्लेशी (मल्लू) भोसले ऊर्फ रमेश शंकर चव्हाण याच्याशी सुरज पवार याचा किरकोळ वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी आरोपीने सुरज पवार याच्या पोटात धारदार हत्यार खुपसून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी सुरज पवार याला तातडीने उपचारासाठी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोपाळ पवार, पोलीस निरीक्षक, यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या भागांत पथके रवाना केली. तपासात मल्लेशी भोसले ऊर्फ रमेश शंकर चव्हाण (राहणार यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे), अभिषेक ऊर्फ अक्षय मल्लू भोसले (वय ३० वर्षे, राहणार यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे) आणि रामचंद्र मल्लू भोसले (वय ३० वर्षे, राहणार चिंचवड, पुणे) यांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश चव्हाण करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस हवालदार गणेश बोरकर, किर्तीलाल गायाकवाड, गणेश काटकर, विकास निर्मळ, किसन बेलदार, अमोल गायाकवाड आणि महेश पवार, तसेच पोलीस अंमलदार अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव आणि गणेश वानकर यांनी सहभाग घेतला.
किरकोळ वादातून घडलेल्या या गंभीर घटनेचा तपास करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.
