



देवीच्या अंगावरील १२ लाख रुपये किमतीचे सहा किलोहून अधिक चांदीचे दागिन्यांवर डल्ला कटफळ परिसरात खळबळ
कटफळ – बारामती तालुक्यातील कटफळ येथील प्रसिद्ध जानाई मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.देवीच्या अंगावरील जवळपास १२ लाख रुपये किमतीचे सहा किलोहून अधिक चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पहाटे मंदिराचे पुजारी आप्पा गुरव यांनी नेहमीप्रमाणे मंदिर उघडल्यानंतर हा चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.देवीच्या अंगावरील चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.कटफळ येथील जानाई मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून,या मंदिरात झालेल्या चोरीमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मंदिरासारख्या धार्मिक स्थळात चोरट्यांनी हात साफ केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून,चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.या चोरीप्रकरणी पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत. संध्या लाईव्ह न्युज करीता कृष्णमुर्ती जगताप बारामती
