

पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल अध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि रोजगार क्षमतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंडळाच्या के-स्किम अंतर्गत अभ्यासक्रमांसाठी ई-कंटेंट निर्मिती करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक स्टुडिओचे तसेच शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई येथे स्थापन करण्यात आलेल्या बहुउद्देशीय संगणक केंद्राचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विषयातील संकल्पना अधिक सुस्पष्टपणे समजाव्यात, त्यांना स्वयंअध्ययन करता यावे तसेच परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने के-स्किम अंतर्गत निवडक विषयांसाठी व्हिडिओ व्याख्याने आणि विविध स्वरूपांतील डिजिटल अध्ययन साहित्य विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत ई-ट्युटोरियल्स, द्विभाषिक ई-कंटेंट, प्रयोगशाळा हस्तपुस्तिका, व्हिडिओ व्याख्याने, सादरीकरणे तसेच मार्गदर्शक वाचन साहित्य अशा विविध स्वरूपांतील डिजिटल अध्ययन संसाधनांची टप्प्याटप्प्याने निर्मिती करण्यात येणार आहे. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गातील अध्यापन अधिक प्रभावीपणे समजून घेणे, स्वयंअध्ययन व उजळणी करणे तसेच परीक्षेची तयारी करणे सुलभ होणार आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई येथे अत्याधुनिक सुविधांनी युक्त बहुउद्देशीय संगणक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राचा उपयोग विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी होणार आहे.
या दोन्ही सुविधांमुळे पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययनाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या ज्ञानवृद्धीला आणि कौशल्य विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.
यावेळी तंत्र शिक्षण संचालनालय तथा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अमोल मुत्याल, मंडळाचे सचिव डॉ. मारुती जाधव तसेच विभागातील व मंडळातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
