Headlines

राष्ट्रगीताचा सन्मान, पुणेकरांच्या अभिमानाचा ऐतिहासिक सोहळा!

शनिवारवाड्याच्या प्रांगणात ३६ हजार दीप प्रज्वलित करून ‘वन्दे मातरम्’ सार्ध शताब्दी निमित्त विश्वविक्रमाचा प्रयत्न

राष्ट्रगीताचा सन्मान, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण आणि देशभक्तीच्या सामूहिक भावनेचा जागर करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात
वन्दे मातरम् च्या सार्ध शताब्दीनिमित्त भव्य ‘वन्दे मातरम् दीप प्रज्वलन सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये एकाच वेळी तब्बल ३६ हजार दीप प्रज्वलित करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. भारतातील आणि पुणे महानगरपालिकेचा अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे.
देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रगीताप्रती आदरभाव व्यक्त करणारा हा अनोखा सोहळा पुण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात एक नवा अध्याय जोडणारा ठरणार आहे. हजारो दीपांच्या प्रकाशातून ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रभावनेला सामूहिक अभिवादन करण्याचा हा उपक्रम पुणेकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
या सोहळ्याचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या वीरमातांचा आणि वीरनारींचा विशेष सन्मान त्यांच्या त्यागाला, धैर्याला आणि देशसेवेच्या भावनेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात येणार आहे. सर्व वीरनारींना एक सन्मानचिन्ह, पंचवीस हजार रूपयांचा धनादेश आणि दिवाळी फराळ ह्यावेळेस देण्यात येणार आहे.
कार्यक्रमात भारतीय सैन्याच्या मिलिट्री बँडचे विशेष वादन, ‘वन्दे मातरम्’ गीताचे सादरीकरण तसेच संपूर्ण सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार केवळ उपस्थित मान्यवर नव्हे, तर विविध माध्यमांद्वारे देशभरातील व जगभरातील नागरिकांनाही होता येणार आहे.
पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या साक्षीने साजरा होणारा हा दीपोत्सव केवळ दिव्यांचा प्रकाश नसून, राष्ट्रप्रेम, शौर्य, त्याग आणि एकात्मतेचा संदेश देणारा उपक्रम आहे. प्रत्येक दीपातून देशाप्रती असलेली निष्ठा आणि अभिमान व्यक्त करण्याचा या आयोजनामागील मुख्य हेतू आहे.
या भव्य सोहळ्याची संकल्पना पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांची असून, पुणे महानगरपालिका आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील :

  • दिनांक : शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६
  • वेळ : सायंकाळी ६ वाजता
  • स्थळ : शनिवारवाडा प्रांगण, पुणे
  • विशेष आकर्षण : ३६ हजार दीप प्रज्वलन, वीरनारींचा सन्मान, मिलिट्री बँड वादन आणि ‘वन्दे मातरम्’ गीताचे सादरीकरण.
  • प्रवेश : केवळ निमंत्रितांसाठी.
    चला, हजारो दीपांच्या प्रकाशातून राष्ट्रगीताचा सन्मान आणि पुणेकरांचा अभिमान जगासमोर उजळवूया!
    आयोजक : पुणे महानगरपालिका.