आमदार सोपलांचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना पत्र; नुकसानभरपाई, कर्ज पुनर्गठन व विशेष पॅकेजची मागणी
बार्शी – पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे बार्शी तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतपिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत व आवश्यक सवलती द्याव्यात,अशी मागणी आमदार दिलीप सोपल यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
बार्शी तालुक्यात यंदा अपेक्षित पाऊस झालेला नसून पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी यासह विविध पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके कोमेजून वाळण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी व डिझेलवर केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून व उधार-उसनवारी करून पेरणी केली असताना उत्पादनाचीच शक्यता कमी झाल्याने कर्जफेड, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि पुढील हंगामाच्या खर्चाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत गावनिहाय व पिकनिहाय प्रत्यक्ष पाहणी करून सर्वसमावेशक पंचनामे करावेत, अशी मागणी सोपल यांनी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार तातडीने पीक नुकसानभरपाई द्यावी, पीक कर्जाचे पुनर्गठन व मुदतवाढ द्यावी, पुढील हंगामासाठी बियाणे व कृषी निविष्ठांसाठी विशेष मदत करावी, तसेच पूर्णपणे नुकसान झालेल्या भागाचा दुष्काळसदृश परिस्थिती म्हणून स्वतंत्रपणे विचार करून विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय पिण्याचे पाणी व पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था, आवश्यकतेनुसार चारा उपलब्ध करून देणे, पीक विम्याची भरपाई मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बार्शी तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांची नव्हे, तर संकटाच्या काळात प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे सुरू करून पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत द्यावी,” अशी ठाम भूमिका आमदार दिलीप सोपल यांनी मांडली आहे.
