वनगळी (इंदापूर) येथील एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्क्रॅप मटेरियलचा प्रभावी वापर करून ‘गरुडा’ ही बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर यशस्वीरित्या विकसित केली आहे.पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली ही इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सुमारे ६० किलोमीटर अंतर पार करू शकते. गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी लागतो. तसेच या वाहनामध्ये रिव्हर्स चार्जिंग सुविधा, जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली आणि सुरक्षेसाठी कॅमेरा बसविण्यात आला आहे. त्यामुळे वाहनाचा मागोवा घेणे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने देखरेख करणे अधिक सुलभ होते.या वाहनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती प्रामुख्याने स्क्रॅप मटेरियलपासून करण्यात आली आहे. त्यामुळे कमी खर्चात, पर्यावरणपूरक आणि उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. ही गाडी ताशी सुमारे 50 किलोमीटर वेगाने धावू शकते.
या प्रकल्पासाठी मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. मयूर जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाने बॅटरी प्रायोजित करून विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर बनविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.टी शिरकांडे, अकॅडमीक डिन डॉ. व्ही एस नलवडे, आणि सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील सचिव. भाग्यश्री पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे, विश्वस्थ राजवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
