· मॅग्नमच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरचे वाकडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
· मॅग्नमच्या केंद्रातून एक हजारांहून अधिक रोजगार
· कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान व लॉजिस्टिक्सचा वापर
पुणे, दि. 4 : ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) प्रमुख केंद्र म्हणून पुणे वेगाने विकसित होत असून, पुण्यात आतापर्यंत 130 पेक्षा अधिक जीसीसी कार्यरत झाले आहेत. आगामी एका वर्षात ही संख्या 800 पेक्षा अधिक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जीसीसी क्षेत्रात पुण्याने देशात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवावे, हे राज्य शासनाचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाकड येथील ईओएन वेस्ट आयटी पार्कमध्ये मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, शंकर जगताप, उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजीत भट्टाचार्य, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह उद्योजक आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी देशातील प्रमुख आणि पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनले असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यात जागतिक कंपन्यांकडून ग्लोबल व्यवसाय सेवा केंद्रे सुरू करण्याला मिळणारा प्रतिसाद हा शहरातील उद्योगपूरक वातावरण आणि उपलब्ध कुशल मनुष्यबळाची पावती आहे. मॅग्नमचे पुण्यातील केंद्र एक हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे.
