पुणे : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि पात्रतेच्या याद्यांमधील नोंदी यांसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि माहितीवर आधारित करण्यासाठी पुण्यातील शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेडने (एससीपीएल) डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांची जमीन, पिके, पेरणी, उत्पादन, खर्च आणि नुकसानीसंबंधी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे याचा सगळ्यात जास्त फायदा हा नुकसानभरपाई आणि विम्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक पुरावे संकलित करण्यासाठी होणार आहे. शेअर क्रॉपर्सच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत संस्थापिका कृष्णा भट, सुधा ज्योती, संजय खत्री यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
कृष्णा भट म्हणाल्या, “प्रत्येक नैसर्गिक आपत्तीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती गोळा करणे, पंचनामे करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे, अशा अनेक टप्प्यांतून जावे लागते. अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या नावाची नोंद झाली आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये बऱ्याच फेऱ्या माराव्या लागतात. पण ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक नोंदींचे डिजिटल स्वरूपात एकत्रीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. या प्रणालीमध्ये शेतजमीन, प्लॉट, पेरणी, पीकनिहाय माहिती, बियाणे व खतांची खरेदी, मजुरी, फवारणी, यंत्रसामग्री, सिंचन, उत्पादन, विक्री तसेच नफा-तोटा यांची सोप्या पद्धतीने नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे शेतीसंबंधी विविध माहिती आणि कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याऐवजी ती एकाच डिजिटल व्यवस्थेत उपलब्ध होतील. या माहितीच्या आधारे शेतीचा खर्च कमी करणे, कर्ज किंवा विम्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे पीक व्यवस्थापनाबाबत अधिक अचूक निर्णय घेणे शक्य होणार आहे.”
संजय खत्री म्हणाले, “या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प पोर्टल’ हे शेतकरी, शेतकरी मित्र, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), संस्था आणि सेवा भागीदारांना जोडणारे केंद्रीय व्यासपीठ असेल. ‘खेत नायक’ या मोबाइल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीची स्थिती, खर्च, उत्पादन आणि विविध सेवांची माहिती पाहता येईल. तर ‘किसान नायक’ हे ॲप गावपातळीवर कार्यरत शेतकरी मित्रांसाठी असून, त्याद्वारे शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करणे, त्यांची पडताळणी करणे आणि आवश्यक छायाचित्रे व कागदपत्रे जोडणे शक्य होणार आहे. या ॲपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित स्मार्ट इनबॉक्सची सुविधाही असेल. शेतकऱ्यांना रेकॉर्ड ठेवण्याबाबत पुरेशी माहिती नसते, मात्र त्यामुळे त्यांचे अधिक नुकसान होते. या अपव्दारे हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात गावांच्या शाश्वततेसाठी काम केले जाणार आहे. गेल्या काही वर्षात आपल्याकडे शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढले असून ते कमी करण्यासाठी या यंत्रणेचा चांगला उपयोग होईल. यामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला असून शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे.
“या तीनही डिजिटल प्लॅटफॉर्मचे औपचारिक लोकार्पण सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे शेतकरी नेते अनिल घनवट यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ‘मशिनरी ऑन फ्युएल कॉस्ट’ या उपक्रमांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीओ) भागीदारांना पाच ट्रॅक्टर हस्तांतरित करण्यात येणार आहे. स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सीमा नारोडे, वृत्ती ग्रुपचे संस्थापक वीरेंद्र जमदाडे, ‘फिनसो’चे संस्थापक दीपक शुक्ला, ऍग्रोवनचे संपादक रमेश जाधव, कृषी व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. यशवंत साळे, राहुल पाटील आदी उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात शेतकरी मित्र शेतकऱ्यांना नोंदी तयार करण्यापासून आवश्यक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यापर्यंत मदत करणार आहेत. पिकांचे छायाचित्र, त्याचे स्थान, तारीख, पेरणीची नोंद, पिकाची अवस्था आणि शेतीवरील खर्चाचा इतिहास यांची माहिती एकत्रित ठेवता येईल. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर त्याची छायाचित्रे आणि संबंधित नोंदी याच डिजिटल संचिकेत जोडल्यास विमा दावा किंवा शासकीय मदतीच्या प्रक्रियेत पूरक पुरावे म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो. शेतकरी, शेतकरी मित्र, एफपीओ, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध संस्था आणि माध्यम प्रतिनिधींना या डिजिटल प्रणालीची माहिती देणे, तसेच शेती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे, असेही त्यांनी नमूद केले.
