Headlines

श्री सोमेश्वर साखर कारखाना निवडणुक भाजपा स्वबळावर लढवणार’

संपूर्ण पॅनेलसह सर्व जागा लढवण्याचा निर्णय शेतकरी,सभासद व कार्यकर्ता मेळाव्यात सर्वानुमते निर्णय

सोमेश्वरनगर – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड,सोमेश्वरनगरच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६-२०३१ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) भव्य शेतकरी सभासद व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात कारखाना निवडणुकीसाठी संपूर्ण पॅनेल उभे करून सर्वच्या सर्व जागा पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय सर्वानुमते जाहीर करण्यात आला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी चंदरअण्णा तावरे होते.त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कारखान्याच्या आगामी निवडणुकीसंदर्भात शेतकरी,सभासद,कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी आमदार संजय जगताप,माजी आमदार अशोक टेकवडे,माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रंजन तावरे,पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे,किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष दिग्विजय काकडे,डॉ.नितीन सावंत यांच्यासह बारामती,पुरंदर,फलटण व खंडाळा परिसरातील भाजप मोर्चा,आघाडी व मंडल अध्यक्ष,शेतकरी सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित शेतकरी,सभासद व कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आले.तसेच आगामी निवडणुकीची दिशा, पॅनेलची रचना,उमेदवारांची निवड आणि निवडणूक रणनीती याबाबत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली.

या सर्व चर्चेनंतर भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक संपूर्ण पॅनेलच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय जाहीर केला.कारखाना निवडणुकीतील सर्वच्या सर्व जागा पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या निर्णयामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली असून,भाजपने निवडणुकीच्या मैदानात ताकदीने उतरण्याची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.आगामी काळात उमेदवारांची निवड,पॅनेलची घोषणा आणि निवडणुकीची प्रत्यक्ष रणनीती याकडे शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे.सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा मेळावा भाजपच्या आगामी राजकीय रणनीतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *