जळोचीतील श्रीरामनगर परिसरातील घटना; मृत्यूमागील कारणांचा पोलीसांकडून तपास सुरू
बारामती – शहरातील महिलांच्या आत्महत्येचे सत्र थांबत नसून एका शिक्षीकेने सोमवारी (ता. 7) राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या बाबत शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु केला आहे.सोनाली दिलीपकुमार ठोंबरे (वय ३९,रा.श्रीरामनगर लेन क्रमांक १,जळोची,ता.बारामती) असे मृत महिलेचे नाव आहे.
जळोची येथील श्रीरामनगर परिसरात ही घटना घडली.मृत महिला बारामती नगर परिषद शाळा क्रमांक ५ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
सोनाली दिलीपकुमार ठोंबरे (वय ३९, रा.श्रीरामनगर,लेन क्रमांक १, जळोची,ता.बारामती) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रासह बारामती शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सोमवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास सोनाली ठोंबरे या त्यांच्या राहत्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिक व नातेवाईकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.मृत महिलेचे बंधू महावीर उत्तम ठोंबरे (वय ५७,रा.बोरी, ता.इंदापूर,सध्या रुईपाटी,ता. बारामती) यांनी पोलिसांना याबाबत खबर दिली.त्यानुसार बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
चिठ्ठी आढळल्याची माहिती
दरम्यान,पोलिसांच्या प्राथमिक तपासादरम्यान एक चिठ्ठी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.या चिठ्ठीत आपल्या मुलांची काळजी घेण्याची भावनिक विनंती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच मुलांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी,त्यांना एकटे सोडू नये,अशा आशयाचा उल्लेख असल्याची माहिती आहे.
आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये,असाही उल्लेख चिठ्ठीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र,या चिठ्ठीची सत्यता, त्यातील मजकूर आणि घटनेशी संबंधित इतर सर्व बाबींची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे.
मृत्यूमागील नेमके कारण काय?
सोनाली ठोंबरे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध कागदपत्रे,चिठ्ठी तसेच कुटुंबीय व संबंधित व्यक्तींची माहिती घेऊन तपास करण्यात येत आहे.त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी पोलिसांच्या तपासाचा निष्कर्ष महत्त्वाचा ठरणार आहे.
महिलांच्या आत्महत्यांच्या घटनांबाबत चिंता
बारामती शहर व परिसरात गेल्या काही काळात महिलांच्या आत्महत्यांच्या घटना समोर आल्याने सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त होत आहे.अल्पावधीत अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने महिलांवरील मानसिक ताण, कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती तसेच उपलब्ध समुपदेशन व्यवस्था याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान,सोनाली ठोंबरे यांच्या मृत्यूच्या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत असून मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेशी संबंधित सर्व बाबी तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.
