Headlines

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी अण्णा बनसोडे यांची निवड..डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार..उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा निर्धार..


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील गरवारे क्लब येथे केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी नियुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. कार्यकारणीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अण्णा बनसोडे यांची विश्वस्तपदी निवड झाल्याने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा विस्तार करणे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार असल्याचेही अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कार्यकारिणीच्या बैठकीत
संस्थेचे अध्यक्ष रामदास आठवले, सुखदेव थोरात, संचालक उज्ज्वल निकम, डॉ.वासुदेव गाडे, बी.के.बर्वे,विश्वास पाटील, डॉ. वेंकटा स्वामी, अरविंद सोनटक्के, डॉ.एस. एक. भागवत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *