नाझरे सुपे, ता. पुरंदर (वार्ताहर – अनिकेत नितीन काळे) : पुणे जिल्ह्यातील वाढती वाहतूक, पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भविष्यातील औद्योगिक व व्यापारी विस्तार लक्षात घेता कोंढवा-भिवरी-सासवड या प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण तातडीने करावे, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे पुरंदर तालुका पश्चिम अध्यक्ष संदिप बबन कटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या पुणे शहरातून सासवडकडे जाणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. दिवसेंदिवस दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र रस्ता अरुंद असल्याने रोजच वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या मार्गावरून प्रवास करणारे हजारो नागरिक, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी यांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प साकार होत असल्याने या रस्त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. भविष्यात पुण्यातून विमानतळावर जाण्यासाठी कोंढवा-भिवरी-सासवड हा सर्वात जवळचा आणि सोयीचा मार्ग ठरणार आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर प्रवाशांची आणि वाहनांची संख्या कित्येक पटीने वाढणार आहे. तसेच विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्र विकसित होणार असून त्यामुळे मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आतापासूनच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेणे आवश्यक आहे.
या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या कायमची संपुष्टात येईल. नागरिकांना सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल. त्याचबरोबर पुरंदर विमानतळाच्या विकासाला गती मिळून संपूर्ण तालुक्याच्या आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निधी उपलब्ध करून कामास मान्यता द्यावी, अशी मागणी कटके यांनी केली आहे.
