Headlines

चौफुला दहिहंडीत सराईत गुन्हेगारांचा नंगानाच ; यवत पोलिसाकडून २४ व्यक्तींवर गुन्हा दाखल!

सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून दहशत पसरविल्याचा आरोप; महाराष्ट्र पोलीस अधिनियमासह भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई

दहिहंडी उत्सवादरम्यान सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या आशयाची रील प्रसारित करणे आणि सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी दहिहंडी आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपी व त्यांच्या साथीदारांवर कायदेशीर कारवाई केली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केडगाव,चौफुला येथे ९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता श्रीकृष्ण दहिहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक शुभम प्रकाश टेळे (रा. टेळेवाडी, ता. दौंड) आणि रामकृष्ण आनंदा काळे (रा. बोरीपारधी, ता. दौंड) असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी काढलेल्या आदेशातील महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) च्या तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, याची माहिती असतानाही रेकॉर्डवरील आरोपी व त्यांच्या साथीदारांना दहिहंडी कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात पोलिसांनी परशुराम उर्फ आबा केरू गडदे, नवनाथ पंढरीनाथ गायकवाड, गौरव उर्फ बंटी दिनेश पांढरे, युवराज राजाराम शिंदे, महेश मारुती टुले, विशाल दादासो गडदे, विशाल उर्फ अण्णा माकर, सौरभ कोळपे, अनिल शेंडगे तसेच इतर १५ साथीदार अशा एकूण २४ जणांविरोधात कारवाई केली आहे.

दहिहंडी कार्यक्रमादरम्यान चौफुला-सुपा महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून समाजामध्ये शांतता भंग करण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करणाऱ्या आशयाची रील इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या रीलला ‘किंग ऑफ दौंड’ अशा आशयाचे कॅप्शन देण्यात आले होते. तसेच आक्रमक आशयाचे गाणे वापरून ही पोस्ट केल्याचे पोलिसांनी माहिती दिली.

या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने आयोजकांसह संबंधित आरोपी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड तसेच तपास पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह अथवा दहशत निर्माण करणारा मजकूर प्रसारित करणे आणि सार्वजनिक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या प्रकारांविरोधात यवत पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *