

माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टी निर्मित गावठी दारूची बेकायदेशीर वाहतूक व साठा करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बारामती पथकाने मोठी कारवाई केली.या कारवाईत 380 लिटर गावठी दारू,दोन चारचाकी वाहने आणि चार मोबाईल संच असा एकूण 7 लाख 22 हजार 50 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दि. 9 सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय व खात्रीलायक माहितीच्या आधारे घाडगेवाडी गावच्या हद्दीत निरावागज-मेखळी रोडवर ही कारवाई करण्यात आली.यावेळी सिताराम अंकुश भंडळकर व एकनाथ वामनराव जाधव,दोघे रा.खांडज, ता.बारामती,यांना महिंद्रा बोलेरो वाहनातून 8 रबरी ट्यूबमध्ये सुमारे 320 लिटर गावठी दारूची वाहतूक करताना अटक करण्यात आली.
आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार माळेगाव कॉलनी, शारदानगर,बारामती येथून गावठी दारू विक्रेता मयुर संजय चव्हाण याला 20 लिटर दारूसह अटक करण्यात आली.तसेच मौजे सराटी,ता.इंदापूर येथे कारवाई करून गावठी दारू पुरवठादार विकास राठोड,रा.माळीनगर, ता.माळशिरस याला हुंडाई सेंट्रो कार व 40 लिटर गावठी दारूसह ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत एकूण 380 लिटर गावठी दारू,दोन चारचाकी वाहने आणि चार मोबाईल संच जप्त करण्यात आले.या प्रकरणातील चारही आरोपींना बारामती न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
दरम्यान,मे 2026 मध्ये पुण्यात मिथेनॉल मिश्रित हातभट्टी दारूच्या सेवनामुळे 26 जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले. जून 2026 पासून आतापर्यंत बारामती विभागाने बारामती तालुका व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध हातभट्टी दारू निर्मिती,वाहतूक व विक्री तसेच बनावट व परराज्यातील मद्याविरोधात 51 गुन्हे दाखल केले आहेत.या कारवायांमध्ये 71 आरोपींना अटक करण्यात आली असून 798 लिटर हातभट्टी दारू, 3,820 लिटर रसायन,156 लिटर बनावट/परराज्यातील विदेशी मद्य तसेच वाहने असा एकूण 19 लाख 2 हजार 465 रुपयांचा मुद्देमाल जप्त किंवा नष्ट करण्यात आला आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संभाजी बर्गे, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, सागर साबळे,मनोज होलम,गणेश जाधव तसेच जवान सागर दुबळे, निखिल देवडे,सुरेश खरात,संकेत कांबळे,तानाजी काळे आणि सायली आटोळे यांनी सहभाग घेतला.पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे करत आहेत.
अवैध हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक किंवा विक्री तसेच बनावट देशी-विदेशी मद्याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 020-26127321 या क्रमांकावर माहिती द्यावी.माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल,असे विभागाने आवाहन केले आहे.
