Headlines

शेतकरी अस्मानी संकटात!चोरट्यांकडून सुलतानी घाला! निंबुत मधील तीन शेतकऱ्यांच्या विद्युत केबल चोरी

निंबूत – अस्मानी संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता विद्युत केबल चोरीच्या घटनांनी भर पडली आहे. निंबूत परिसरातील तीन शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे शेतीला पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.निंबूत परिसरात गेल्या काही वर्षांपासून विद्युत मोटार पंप व केबल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.चोरी झाल्यानंतर नवीन केबल व विद्युत साहित्य खरेदी करण्याचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत असून,आधीच शेतीमालाला मिळणारे दर,वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.यापूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तसेच करंजे पूल पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी विद्युत पंप व केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.त्यावेळी काही चोरीच्या घटनांचा तपास करून संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली होती.काही गुन्हे उघडकीस आल्याने संबंधित शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला होता.मात्र,गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पुन्हा अशा चोरीच्या घटना वाढत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.त्यामुळे पोलिसांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन चोरीच्या घटनांचा सखोल तपास करावा,यापूर्वीच्या प्रकरणांतील तपासाची माहिती घेऊन चोरट्यांचा माग काढावा आणि चोरीला गेलेले विद्युत पंप व केबल शोधून संबंधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतीचा वीजपुरवठा आणि सिंचन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विद्युत साहित्य चोरीला आळा घालणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *