Headlines

३२ महिन्यांचे वेतन थकीत; १५ दिवसांत प्रलंबित वेतन देण्याचे निर्देश

भारतीय मजदूर संघाच्या पाठपुराव्याला यश; प्रश्न न सुटल्यास संस्थेच्या मान्यतेबाबत विचार करण्याचा मंत्र्यांचा इशारा

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीमधील कामगारांचे गेल्या ३२ महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन, भविष्य निर्वाह निधी (PF) आणि अन्य विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गेल्या तीन महिन्यांपासून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कामगारांचे आंदोलन व सत्याग्रह सुरू असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत कामगारांच्या प्रलंबित वेतनासह पीएफ व अन्य प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वेतनप्रश्नी येत्या १५ दिवसांत आवश्यक कार्यवाही करून अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी दिल्याची माहिती भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच, प्रश्नांची वेळेत सोडवणूक न झाल्यास संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत शासनाला विचार करावा लागेल, असा इशाराही मंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन प्रलंबित असल्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भविष्य निर्वाह निधी (PF) आणि अन्य प्रलंबित देण्यांचे प्रश्नही अद्याप सुटलेले नाहीत. कामगारांच्या या न्याय्य मागण्यांची तातडीने पूर्तता व्हावी, यासाठी कामगारांनी आंदोलन व सत्याग्रहाच्या माध्यमातून आपला लढा सुरू ठेवला आहे.

भारतीय मजदूर संघाने कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीमुळे प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. मात्र, बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांची निर्धारित मुदतीत प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन कामगारांना त्यांचे प्रलंबित वेतन व अन्य न्याय्य हक्क मिळणे आवश्यक आहे.

यावेळी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव श्री. बाळासाहेब भुजबळ म्हणाले, “सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ सातत्याने प्रयत्नशील आहे. ३२ महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन, पीएफ आणि अन्य प्रश्न तातडीने निकाली निघणे आवश्यक आहे. बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांची निर्धारित मुदतीत अंमलबजावणी झाली पाहिजे. कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळेपर्यंत भारतीय मजदूर संघाचा संघर्ष सुरूच राहील.”

बैठकीस मान्यवरांची उपस्थिती सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री एम एन नवले संचालक श्री प्रकाश पाटील तंत्र शिक्षण विभागाचे संचालक श्री प्रमोद नाईक सहसंचालक डॉक्टर सुरेश पाटील तंत्र शिक्षण विभागाचे आवर सचिव श्री अमोल मुत्याल उच्च शिक्षण विभागाचे संचालक श्री शैलेंद्र देवळणकर, उच्च विभागाचे सहसंचालक डॉक्टर उबाळे व तंत्र शिक्षण व उच्च विभाग उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी या मीटिंगसाठी मंत्रालयात उपस्थित होते भारतीय मजदूर संघाच्या वतीने प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ श्री अनिकेत जाधव कामगार प्रतिनिधी कोंढवा कॅम्पस श्री औदुंबर ताठे कामगार प्रतिनिधी नरे कॅम्पस व श्री शुभम फाळके कामगार प्रतिनिधी लोणावळा कॅम्पस इत्यादी संघटनेचे पदाधिकारी या मीटिंगसाठी मंत्रालयात उपस्थित होते मीटिंग चांगल्या पद्धतीने संपन्न झाली व या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने व संस्थेच्या भवितव्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल पुढे पडल्याची माहिती संघटनेचे प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ यांनी यावेळी बोलताना दिली सर्व वस्तूंचे मंत्रिमंडळाचे व सिंहगड संस्थेचे अध्यक्ष श्री एम एन नवले सर यांचे बाळासाहेब भुजबळ यांनी आभार मानून सदरची मीटिंग संपन्न झाली

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची वेळेत सोडवणूक होऊन त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा कामगारांकडून व्यक्त केली जात आहे. वेतन, पीएफ आणि अन्य प्रलंबित प्रश्न प्रत्यक्ष निकाली निघेपर्यंत भारतीय मजदूर संघाचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केला आहे .