भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या वतीने विक्रोळी पूर्वेतील कन्नमवार नगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्सव आदिशक्तीचा, जागर मराठी मनाचा’ या मराठी दांडिया महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यानंतर आता मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी भेट दिली.यावेळी प्रसिद्ध गायक आणि रॉकस्टार अवधूत गुप्ते यांच्या अदाकारीने दांडिया रसिकांना मंत्रमुग्ध केले. उत्साहपूर्ण वातावरणात रंगलेल्या या महोत्सवात महापौरांनी सहभागी नागरिकांचा दांडिया पाहत आनंद लुटला.
या प्रसंगी विक्रोळी पूर्व भाजप मंडळाच्या अध्यक्षा केतकी सांगळे ईशान्य मुंबई भाजपचे अध्यक्ष दीपक दळवी,माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून, १५ ते १९ ऑक्टोबरदरम्यान त्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी संस्कृती, परंपरा आणि वेशभूषेला प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. दररोज उत्कृष्ट मराठमोळी वेशभूषा करणाऱ्या दोन महिला आणि दोन पुरुषांची निवड करून त्यांना प्रत्येकी एक आयफोन देण्यात येणार आहे.
हा महोत्सव नागरिकांसाठी विनामूल्य खुला असल्याने मोफत प्रवेश पास मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. हा दांडिया महोत्सव यशस्वी करण्यासाठी विक्रोळी पूर्व भाजप मंडळ अध्यक्ष केतकी सांगळे, प्रथमेश राणे आणि सुशील कुर्रे यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
