Headlines

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलींना रिफ्लेक्टरचा अभाव; अपघाताचा धोका वाढला!

रात्रीच्या अंधारात ट्रॉली दिसत नसल्याने दुचाकीस्वारांसह वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

वालचंदनगर : इंदापूर व बारामती तालुक्यातील साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस वाहतुकीला वेग आला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रॅक्टरच्या ट्रॉलींना रेडियम रिफ्लेक्टर नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रस्त्यावर बंद पडलेली किंवा पंक्चर झालेली ट्रॅक्टरची ट्रॉली अंधारात वाहनचालकांना सहज दिसत नसून अपघातांचा धोका वाढला आहे.

रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार तसेच इतर वाहनचालकांना रस्त्यावर चाललेली किंवा उभी असलेली ट्रॉली वेळेत दिसली नाही, तर गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः ऊस वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरची ट्रॉली बंद पडल्यास किंवा पंक्चर झाल्यास, तिच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनचालकांना तिचा अंदाज येत नाही.

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असताना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढते. त्यामुळे ट्रॅक्टरच्या ट्रॉलींना पुढील व मागील बाजूस तसेच आवश्यक ठिकाणी रेडियम रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे. तसेच रात्रीच्या वेळी ट्रॉली रस्त्यावर बंद पडल्यास वाहनचालकांना पूर्वसूचना मिळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित साखर कारखाना प्रशासन, वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॉलींबाबत तपासणी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.