पुणे महानगरपालिकेच्या सर्व १० क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकाच वेळी बालसभा उत्साहात संपन्न; शहराच्या विकासात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग


शहराच्या विकास प्रक्रियेत केवळ लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचाच नव्हे, तर विद्यार्थ्यांचाही सक्रिय सहभाग असावा, त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळावे, या दूरदृष्टीतून पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिका आणि माजी खासदार व माजी महापौर वंदना चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालसभा – मुलांचा आवाज, शहराच्या विकासात!’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज पुणे महानगरपालिकेच्या सर्व १० क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकाच वेळी पहिली बालसभा मोठ्या उत्साहात पार पडली.
नगर रोड-कळस-लोहगाव, शिवाजीनगर-घोले रोड, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, सिंहगड रोड, धनकवडी-आंबेगाव, हडपसर-मांजरी, वानवडी-रामटेकडी, कसबा पेठ आणि विश्रामबागवाडा या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘पुणे क्लायमेट वॉरियर (PCW 5.0)’ अंतर्गत ‘वॉर्ड वॉच – उज्ज्वल उद्यासाठी युवा सहभाग’ या अभियानाच्या माध्यमातून आयोजित या बालसभेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव, नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करणे हा आहे.
या बालसभेत विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या कामकाजाची माहिती घेत आपल्या परिसरातील दोन स्थानिक समस्या आणि संपूर्ण शहराच्या दोन प्रमुख समस्या प्रशासनासमोर मांडल्या. स्वच्छता, खेळाची मैदाने, वाहतूक सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, परिसराचे सुशोभीकरण तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक नागरी सुविधांबाबत विद्यार्थ्यांनी आपली मते मांडत विविध उपाययोजनाही सुचवल्या. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांना नागरी प्रशासनाच्या कामकाजाची माहिती दिली.
यावेळी महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, “आजची मुले ही उद्याच्या विकसित पुण्याची शिल्पकार आहेत. शहराच्या विकासाचे नियोजन करताना बालकांच्या गरजा, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या कल्पनांचाही विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा लहान मुलांना त्यांच्या परिसरातील समस्या अत्यंत अचूकपणे जाणवतात आणि त्यावर ते अतिशय चांगल्या सूचना देतात. त्यांच्या या विचारांना व्यासपीठ मिळावे, प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळावी आणि लहान वयातच त्यांच्यामध्ये शहराप्रती जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, यासाठी बालसभेची संकल्पना राबविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्यांचा आणि सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात येतील. बालसभेचा हा उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा आमचा मानस आहे.”
पुणे शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता तो बालस्नेही, पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक असावा, यासाठी महापौर मंजुषा नागपुरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. बालसभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शहराच्या विकास प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग बनविण्याच्या दिशेने पुणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, पालकांचे, स्फूर्ती फाउंडेशन, पुणे क्लायमेट वॉरियर टीम तसेच पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महापौर मंजुषा नागपुरे यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले.
