Headlines

राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित–मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलपिकांच्या नुकसानीची मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर होणारपंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

राज्यातील ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू झालेल्या एकूण ३०४ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू करण्यात येणार असून, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

        मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य संबंधित घटकांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ट्रिगर-१ लागू झालेल्या २६५ तालुक्यांना 26 सप्टेंबर 2026 रोजी दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते. आता ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ च्या आधारे आणखी 39 तालुक्यांचा नव्याने समावेश केल्याने एकूण 304 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.

दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये १२ उपाययोजना व सवलती
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने १२ विविध उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनांनाचा लाभ नव्याने समावेश करण्यात आलेल्या ३९ तालुक्यांना देखील लागू होणार आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यांचा समावेश आहे.
तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे अधिकाधिक सुरू करण्यासाठी निकषांमध्ये शिथिलता आणणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, टंचाई जाहीर केलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांसाठी अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे आणि पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.