Headlines

कळस–धानोरी–लोहगाव परिसरातील  मुख्य व अंतर्गत रस्त्यांची महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

कळस, धानोरी आणि लोहगाव परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे तसेच वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची गंभीर दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषा  नागपुरे यांनी आज परिसरातील प्रमुख रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यादरम्यान महापौरांनी रस्त्यांची सद्यस्थिती, खड्डे, वाहतुकीची वाढती वर्दळ तसेच नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित स्थानिक नगरसेवक व नागरिक तसेच अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेतली. रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

कळस–धानोरी–लोहगाव परिसरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व आवश्यक ठिकाणी डांबरीकरणाची कामे हाती घेऊन ती गुणवत्तापूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांना रस्त्यांच्या समस्येमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी महापौर सौ. मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “नागरिकांना सुरक्षित, खड्डेमुक्त आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे ही पुणे महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. कळस–धानोरी–लोहगाव परिसरातील रस्त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही केली जाईल. रस्त्यांच्या कामांचा दर्जा आणि वेळेत काम पूर्ण होणे याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

या पाहणी दौऱ्यामुळे परिसरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती मिळण्यास मदत होणार असून, नागरिकांसाठी अधिक सुरक्षित आणि सुकर वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक पावले उचलली जाणार आहेत.

यावेळी नगरसेवक श्री अनिल टिंगरे, नगरसेविका मा. रेखा टिंगरे, नगरसेविका नगरसेविका मा.संगीता दांगट, नगरसेविका मा.अश्विनी भंडारे व पुणे महानगरपालिका चे अधिकारी कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *