पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा नाविन्यपूर्ण उपक्रम
विद्यार्थ्यांनी घेतली महापालिका कामकाजाची माहिती
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता.१७) महापालिका भवन कार्यालयात जाऊन त्यांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला. विद्यार्थ्यांनी आयुक्तांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत स्वतः तयार केलेली ग्रीटिंग कार्ड्स भेट दिली. विद्यार्थ्यांच्या या आपुलकीच्या उपक्रमामुळे आयुक्त नवल किशोर राम भावूक झाले.
चलवादी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी यावेळी आयुक्तांचा शाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मान केला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्काराचे आयुक्तांनी विशेष कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांच्या आवडी-निवडी, शिक्षण आणि भविष्यातील ध्येयांबाबत गप्पा मारल्या.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या सभागृहालाही भेट दिली. महापालिकेचे कामकाज कशा पद्धतीने चालते, सभागृहातील बैठका, निर्णयप्रक्रिया आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. त्यामुळे पुस्तकातील नागरी प्रशासनाचा अभ्यास प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
महापालिका ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेली महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष प्रशासकीय यंत्रणेला भेट देऊन स्थानिक स्वराज्य व्यवस्थेची माहिती मिळणे हा या उपक्रमाचा विशेष शैक्षणिक पैलू ठरला. विद्यार्थ्यांना लोकशाही, संविधान आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
विद्यार्थ्यांना केवळ वर्गातील शिक्षण न देता त्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय व्यवस्था आणि लोकशाही संस्थांची ओळख करून देणारा पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा हा उपक्रम निश्चितच नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद ठरला. या भेटीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी प्राचार्य स्मिता लोंढे, शिल्पा गायधने, प्रशांत निकम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
….
