Headlines

अनैतिक मानवी व्यापार करणाऱ्या दोघांना अटक; दोन महिलांची सुटका

येरवडा पोलिसांची कारवाई; खराडी परिसरातून आरोपी ताब्यात

पुणे : अनैतिक मानवी व्यापारासाठी महिलांना प्रवृत्त करून त्यांना ग्राहकांकडे पाठविणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. खराडी परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक मानवी व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत असताना पोलीस हवालदार रामेश्वर नवले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येरवडा परिसरातील एका हॉटेलमधून ग्राहकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून महिलांना अनैतिक व्यापारासाठी पाठविले जात आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार कल्याणीनगर, येरवडा परिसरातील लॉजमध्ये महिलांना पाठवून त्याबदल्यात ठरावीक रक्कम घेतली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी माहितीची पडताळणी केली. त्यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संबंधित हॉटेलमध्ये कारवाईचे नियोजन करण्यात आले. पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता अनैतिक व्यापारासाठी प्रवृत्त करण्यात आलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली.

सुटका करण्यात आलेल्या महिलांकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा व्यवसाय करवून घेणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. तपास पथकाने अप्पर खराडी रोड परिसरात सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे राज राजेशाम सविता (वय २८, रा. खराडी, पुणे) आणि सुनिल शिवाजी शिंदे (वय ३७, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) अशी आहेत.

या प्रकरणी १४ सप्टेंबर २०२६ रोजी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शारदा कोकाटे, पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद देठे, तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड तसेच पोलीस अंमलदार रामेश्वर नवले, कोकणे, शैलेश वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड, सागर दळवी, लक्ष्मण ठोकळ, नितीन चांदणे, नागेश कुंजटवाड, प्रशांत कांबळे, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, संदिप धादवड आणि महिला पोलीस अंमलदार ज्योती नाईक यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *