
सहकारमहर्षी स्व. चंदुकाका जगताप यांनी स्थापन केलेली पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था स्थापनेपासून कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता, स्वभांडवलावर भक्कमपणे उभी आहे. संस्थेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत असून सर्व शाखा एकमेकांशी संगणकप्रणालीने जोडल्या असून ही संस्था, सभासदांनी संस्थापक स्व. चंदुकाका जगताप आणि अध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्यावर विश्वास ठेवून वाढवली. त्यामुळे पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल नागरी सहकारी बँकेकडे सुरू असून, यापुढेही असाच विश्वास ठेवावा, असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने संस्थेचे मार्गदर्शक व माजी आमदार संजय जगताप यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २०) सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार संजय जगताप, जिल्हा परिषद सदस्य हरीभाऊ लोळे, संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया, सी.ए.प्रा.डॉ.एम.एस. जाधव यांसह सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत विद्येची देवता देवी सरस्वती आणि संस्थेचे संस्थापक स्व. चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमापूजनाने आणि दिपप्रज्वलनाने झाली.
संचालक अनिल कामठे यांनी स्वागत, डॉ. विनायक खाडे यांनी प्रास्ताविक तर सरव्यवस्थापक अनिल उरवणे यांनी अहवालवाचन केले. सहकार विभागाचे एस.बी. वाटाणे यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले.
या वार्षिक सभेत विविध विषयांवर खुली चर्चा झाली. यामध्ये रविंद्रनाथ ताकवले, नंदकुमार जगताप, मार्तंड भोंडे, माणिक चोरमले, संदीप फडतरे, शहाजी सस्ते, आनंद भोसले, विठ्ठल मोकाशी, दीलीप गिरमे, गौतम बेंगाळे, बाबासो जगताप, दामोदर कदम, शिवाजीराव ढमढेरे, प्रदीप पोमण, संजय रूढ आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला व आपले विचार मांडले.
संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडताना माजी आमदार जगताप यांनी सांगितले की, ३१ मार्चअखेर संस्थेच्या १३ शाखा, १५ हजार ४३६ सभासद, ३९० कोटी ४० लाखांच्या ठेवी, सात कोटी ३७ लाखांचे वसूल भागभांडवल, १४ कोटी २० लाखांचा इतर निधी, १०९ कोटी एक लाखाची गुंतवणूक, २९४ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज वाटप असून एक कोटी २६ लाख ९ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेचा ऑडिट वर्ग सतत ‘अ’ राहिला असून यंदाही संस्थेने सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
याप्रसंगी संचालक अंकुश जगताप, राजेश इंदलकर, युगंधरा कोंढरे, बाबासाहेब चौंडकर, चंद्रकांत बोरकर, परशुराम तांबे, सूर्यकांत कांबळे, अमोल सातभाई, अॅड. किशोर म्हस्के, पोपटराव सोनवणे, भारती देशमुख, व्यवस्थापक सतीश शिंदे, हरिभाऊ शिंदे आदी उपस्थित होते. सभेत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा, तसेच शाखा व्यवस्थापक संजय बडदे या कर्मचाऱ्याचा सेवापूर्तीनिमित्त विशेष गौरव करण्यात आला. नंदकुमार सागर यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक आनंदराव घोरपडे यांनी आभार मानले. सभा अत्यंत खेळीमेळीत संपन्न झाली.
