Headlines

शिरूरमध्ये घातक हत्यारांसह फिरणारे दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात! कोयता, स्क्रूड्रायव्हर आणि मोटारसायकलसह ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


शिरूर शहरात रात्रीच्या वेळी घातक हत्यारे घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन तरुणांना शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी लोखंडी कोयता, स्क्रूड्रायव्हर आणि मोटारसायकल असा एकूण ५० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास रामलिंग रोड ते नवीन शिरूर नगरपरिषदेकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या बाजूला हार्द हॉस्पिटलजवळ अंधारात दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक लोखंडी कोयता आणि एक स्क्रू ड्रायव्हर आढळून आला. तसेच त्यांच्याकडील हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलही जप्त करण्यात आली.
या कारवाईत राज रेखा आंधारे (वय २१, रा. शेळकेवस्ती, रांजणगाव) आणि सुजर संतोष उघडे (वय १९, रा. मोडकाई वस्ती, रांजणगाव गणपती, ता. शिरूर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी त्यांच्याकडून ३०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता, १०० रुपये किमतीचा हिरव्या रंगाच्या मुठीचा स्क्रूड्रायव्हर आणि ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्रमांक MH-45-AB-2749) असा एकूण ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
रात्रीच्या वेळी घातक हत्यारे घेऊन फिरणाऱ्या तरुणांवरील या कारवाईमुळे शिरूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शिरूर पोलिसांच्या सतर्कतेचे दर्शन घडले आहे.